अब्दुल कलाम कॉलेजचे क्रिकेट आणि व्हॉलीबॉलमध्ये प्रथम पारितोषिक

विजय बोडखे 



राजुरी (वार्ताहर) - पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय फिजिओथेरपी क्रीडा स्पर्धेत प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या स्पर्धेत कॉलेजच्या संघाने टेनिसबॉल क्रिकेट आणि व्हॉलीबॉल या दोन्ही खेळांत प्रथम क्रमांक पटकावला, तर लेदरबॉल क्रिकेटमध्ये उपविजेतेपद मिळवले, अशी माहिती प्राचार्य डॉ. आर.के. सिन्हा यांनी दिली.
पुण्यातील डेक्कन जिमखाना येथे ५ मार्च ते ८ मार्च या कालावधीत या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. टेनिसबॉल क्रिकेटच्या अंतिम सामन्यात प्रवरेच्या संघाने उत्कृष्ट संघभावना आणि ऊर्जा दाखवत चार गडी राखून विजय मिळवला. व्हॉलीबॉल स्पर्धेतही संघाने निर्भेळ यश मिळवत अंतिम फेरीत २-० अशा फरकाने अजिंक्यपद पटकावले. लेदरबॉल क्रिकेटमध्ये चुरशीच्या लढतीत संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
 क्रिकेट संघाचे नेतृत्व डॉ. सुरज भाने यांनी, तर व्हॉलीबॉल संघाचे नेतृत्व सहाय्यक प्राध्यापक डॉ. अथर्व गुंजाळ यांनी केले. वैयक्तिक कामगिरीमध्ये अनिकेत गायकवाड याला क्रिकेटमधील ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ आणि डॉ. शिव सरदार याला व्हॉलीबॉलमधील ‘प्लेयर ऑफ द टूर्नामेंट’ हा किताब देऊन गौरविण्यात आले.
या यशस्वी खेळाडूंचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, कुलगुरू डॉ. व्ही.एन. मगरे, विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील, सौ. मोनिकाताई सावंत, ध्रूव विखे पाटील, प्राचार्य डॉ. आर.के. सिन्हा, क्रीडा संचालक डॉ. सुनील बुलार आणि विद्यार्थी समन्वयक डॉ. प्रदीप बोरकर यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments