नाशिक -त्रिंबक कुंभमेळ्याची तयारी करताना नियोजन, पर्यावरण, नदीसंवर्धन, आणि साधुसंत व श्रद्धेचा मान यांचा समतोल राखावा--महंत संन्यासी राजराजेश्वरी आत्मारामगिरीजी महाराज

राजकुमार गडकरी 
शिर्डी ( प्रतिनिधी)- भारतातील सनातन धर्मपरंपरेत कुंभमेळा हे एक अत्यंत पवित्र आणि विराट धार्मिक पर्व मानले जाते. साधू-संन्यासी, अखाडे, संत, भक्त आणि कोट्यवधी श्रद्धाळू यांचा संगम या पर्वात घडतो. महाराष्ट्रातील नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभ हा त्यातील अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे.

 या कुंभमेळ्याचे केंद्र म्हणजे पवित्र गोदावरी नदी, विशेषतः रामकुंड आणि पंचवटी परिसर.
नुकत्याच सादर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. कुंभमेळ्याला आता जेमतेम एक वर्षाचा कालावधी उरलेला असताना ही रक्कम खर्च करण्यासाठी जणू काही स्पर्धाच सुरू झाल्यासारखे चित्र दिसत आहे. नाशिक शहर, पंचवटीतील गोदावरी परिसर आणि त्र्यंबकेश्वर या तीनही ठिकाणी कामांची प्रचंड लगबग सुरू आहे. रस्ते, मलनिस्सारण व्यवस्था, पायाभूत सुविधा, तसेच सिंहस्थातील साधुग्रामाची उभारणी यासाठी वेगाने कामे सुरू झाली आहेत.
परंतु येथे एक मूलभूत प्रश्न उपस्थित होतो—ही कामे आता का? अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा कुंभमेळ्याच्या किमान दोन-तीन वर्षे आधी पूर्ण व्हायला हव्या होत्या. नियोजनबद्ध आणि शास्त्रीय पद्धतीने होणारी तयारी ही कुंभपर्वाच्या यशाची गुरुकिल्ली असते. पण प्रत्यक्षात वर्षभरात सर्व कामे उरकण्याचा जो सपाटा सुरू झाला आहे, त्यातून दीर्घकालीन नियोजनाऐवजी तात्पुरत्या व्यवस्थेचे चित्र दिसून येते. असे मत श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत संन्याशी राजराजेश्वरी आत्मारामगिरीजी महाराज यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी नदीच्या काठावरील रामकुंड परिसर अधिक मोकळा करण्याचे काम सध्या सुरू आहे. गर्दीच्या वेळी लाखो भाविक स्नानासाठी येतात, त्यामुळे जागा मोकळी असणे आवश्यक आहे हे निश्चितच योग्य आहे. मात्र पूर्वी कोणताही दूरदृष्टीचा विचार न करता नदीकाठावर अनेक सिमेंट-काँक्रीटची बांधकामे झाली आहेत. नदीचे नैसर्गिक पात्र संकुचित झाले आहे. नदीच्या प्रवाहाला अडथळे निर्माण झाले आहेत. याचा परिणाम असा की, कुंभमेळ्याच्या काळात अपेक्षित प्रमाणात पाणी असणे हीच एक मोठी समस्या बनत आहे.
यंदा पावसाचे प्रमाण चांगले असूनही गंगापूर धरण येथे केवळ सुमारे ६० टक्के पाणी साठा शिल्लक असल्याचे दिसते. याच धरणातून गोदावरी नदीत पाणी सोडले जाते. जर हीच परिस्थिती पुढील वर्षीही राहिली, तर कुंभमेळ्याच्या काळात कोट्यवधी भाविक स्नानासाठी येतील तेव्हा गोदावरीत पुरेसे आणि स्वच्छ पाणी उपलब्ध असेल का? हा गंभीर प्रश्न उभा राहतो.
कुंभमेळा म्हणजे केवळ धार्मिक सोहळा नाही; तो श्रद्धेचा महासागर आहे. लाखो-कोट्यवधी लोक आपली पवित्र भावना घेऊन गोदावरीत स्नान करण्यासाठी येतात. त्या वेळी नदीत स्वच्छ, प्रवाही आणि पुरेसे पाणी असणे ही केवळ व्यवस्थेची बाब नाही, तर ती श्रद्धेचा मान राखण्याची जबाबदारी आहे.
म्हणूनच शासन आणि प्रशासनाने केवळ रस्ते, इमारती आणि तात्पुरत्या व्यवस्था यांवर लक्ष केंद्रित न करता गोदावरी नदीचे जलव्यवस्थापन, धरणांमधून योग्य वेळी पाणी सोडण्याची योजना, आणि नदीचे प्रदूषण रोखण्याची ठोस यंत्रणा यावर आतापासूनच काम सुरू करणे अत्यावश्यक आहे. कुंभमेळ्याच्या काळात शाही स्नानासाठी भरपूर आणि स्वच्छ पाणी उपलब्ध होईल याची हमी देणे हीच खरी तयारी ठरेल.
कुंभ हा केवळ आयोजनाचा विषय नाही; तो आध्यात्मिक संस्कृतीचा उत्सव आहे. म्हणूनच कुंभाभोवतीचे वास्तव पाहताना आपल्याला नियोजन, पर्यावरण, नदीसंवर्धन आणि श्रद्धेचा मान यांचा समतोल साधावा लागेल. अन्यथा भव्य आयोजन असूनही कुंभाचा आत्मा हरवण्याचा धोका निर्माण होईल.
सनातन परंपरेच्या या महान पर्वाचे पावित्र्य जपण्यासाठी शासन, प्रशासन, संत-महंत आणि समाज या सर्वांनी एकत्रितपणे विचारपूर्वक आणि दूरदृष्टीने पावले उचलली, तरच आगामी सिंहस्थ कुंभमेळा खऱ्या अर्थाने यशस्वी आणि पवित्र ठरेल. असेही महंत आत्मारामगिरीजी महाराज यांनी शेवटी म्हटले आहे.त संन्यासी राजराजेश्वरी आत्मारामगिरीजी महाराज

Post a Comment

0 Comments