श्रीरामपूर–नेवासा रोड उड्डाणपुलावरील अपघात रोखण्यासाठी PWD कडून ठोस उपाययोजनाअधिकृत पत्राद्वारे सुरक्षा कामांना गती




श्रीरामपूर | प्रतिनिधी
श्रीरामपूर–नेवासा रोडवरील (रा.मा. ४५) उड्डाणपुलावर वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम उपविभाग, श्रीरामपूर यांनी तातडीच्या व ठोस उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने अधिकृत पत्र काढून उड्डाणपुलावरील सुरक्षा विषयक कामांना गती देण्यात येत असल्याची माहिती दिली आहे.
सदर उड्डाणपुलाची रचना ‘S’ आकाराची असून, वाहनांचा अतिवेग, अपुरी दृश्यता तसेच रात्रीच्या वेळी प्रकाशाचा अभाव यामुळे येथे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे पाहणीत स्पष्ट झाले आहे. भारतीय लहुजी सेनेच्या मागणीनंतर श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (RTO) यांच्या संयुक्त पाहणीत हे निष्कर्ष नोंदविण्यात आले होते.
या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम उपविभागाने उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूंना “अपघात प्रवण क्षेत्र” असे सूचना दर्शक फलक लावले आहेत. तसेच वाहनचालकांना मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी दृश्य अडथळा निर्माण करणारी झाडे व झुडपे काढून टाकण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
याशिवाय उड्डाणपुलावर स्पीड ब्रेकर, कॅट आय रिफ्लेक्टर, संरक्षक कठडे (बॅरिअर) बसविणे, तसेच वेग नियंत्रणासाठी आवश्यक चेतावणी व मार्गदर्शक फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात पुलाच्या मध्यभागी रेलिंग बसवून वाहतुकीचे सेंट्रलायझेशन करण्याचाही प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
या सर्व उपाययोजनांमुळे वाहनांचा वेग नियंत्रणात येऊन गंभीर अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम उपविभागाने व्यक्त केला आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत ही कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.दरम्यान, भारतीय लहुजी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल व राष्ट्रीय सचिव हनीफ भाई पठाण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या उपोषणाला प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. या उपोषणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समाजवादी पार्टी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटना, शिवस्वराज्य मंच तसेच स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. भारतीय लहुजी सेनेने प्रशासनाच्या निर्णयाचे स्वागत करत, सर्व सुरक्षा कामे वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याची मागणी केली असून वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments