तालुक्यात साडेदहा हजार, तर शहरात ५०० एकल महिला


श्रीरामपूर तालुका प्रतिनिधी 

श्रीरामपुरात मिशन वात्सल्य समितीची बैठक
श्रीरामपूर ( प्रतिनिधी)-पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात १० हजार ५७०, तर श्रीरामपूर शहरात ५०६ एकल महिलांची नोंद झाली आहे.
मंगळवारी श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य शासकीय समितीची बैठक तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांच्या अध्यक्षतेखाल झाली. या बैठकीत ही माहिती देण्यात आली. समितीच्या सदस्य सचिव तथा प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे, अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वंदना गिरमे, महिला व बालविकास विभागाच्या तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, तहसील कार्यालयाच्या अव्वल कारकुन अभया राजवळ, श्रीरामपूर नगरपालिकेचे समुदाय संघटक हरीष पैठणे, तालुका आरोग्याधिकारी कार्यालयाचे आरोग्य सहाय्यक एस. व्ही. काकडे, "उमेद"चे तालुका व्यवस्थापक के. के. शेरे यांची बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. सदस्य सचिव शोभा शिंदे मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन करून घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली. श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत एकल महिलांच्या सर्वेक्षणास गती देण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला होता. त्यानुसार श्रीरामपूर नगर पालिका हद्दीत अहिल्यानगर येथील नागरी एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालयांतर्गत शहरातील ३० अंगणवाडींच्या कार्यक्षेत्रात सर्वेक्षण करण्यात आले आहे. त्यानुसार श्रीरामपूर नगरपालिका हद्दीत ५०६ एकल महिलांची नोंद झाल्याचे पालिकेचे समुदाय संघटक हरीष पैठणे यांनी सांगितले. फक्त अंगणवाडीच्या परिसरातच हे सर्वेक्षण झाले आहे. त्यामुळे शहराची १ लाखांहून अधिक लोकसंख्या विचारात घेता शहरातील एकल महिलांची कमी प्रमाणात नोंद झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे शहरात परिपूर्ण फेरसर्वेक्षण करण्याची गरज असल्याकडे मिलिंदकुमार साळवे यांनी लक्ष वेधले. त्याची दखल घेत तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी नगरपालिका हद्दीत प्रभागनिहाय सर्वेक्षण करण्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य घेऊन शहरातील एकल महिलांची परिपूर्ण माहिती संकलित करण्याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांना पत्र देण्याचे निर्देश सदस्य सचिव शिंदे यांना दिले. शहर व ग्रामीण भागातील सर्वेक्षणातून जमा होणारी एकल महिलांची यादी एकत्रित करून त्यानुसार या महिलांना कोण कोणत्या शासकीय योजना, सोईसवलतींचा लाभ मिळत आहे किंवा नाही, याचे विश्लेषण करून त्यांना आवश्यक असलेल्या योजना, सवलतींचा लाभ संबंधित विभागांमार्फत देण्यासाठी कार्यवाही करणार असल्याचे तहसीलदार वाघ यांनी सांगितले. 
शहर व तालुक्यातील एकल महिलांना रोजगार विषयक मार्गदर्शन मिळण्यासाठी रोजगार प्रेरणा कार्यशाळा घेण्याची सूचना साळवे व जपे यांनी केली. त्यावर यासाठी निधीची अडचण असल्याची बाब उमेदचे तालुका व्यवस्थापक शेरे यांनी निदर्शनास आणून दिली. या कार्यशाळेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन तहसीलदार वाघ यांनी दिले. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय एकल महिला सक्षमीकरण समितीच्या बैठकीत हा विषय मांडून जिल्ह्यातील सर्व तालुका पातळीवर रोजगार प्रेरणा कार्यशाळा घेण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मिलिंदकुमार साळवे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments