दिलीप शिंदे
सोयगाव दि. १२-- टॅलेंट कट्टा महाराष्ट्र राज्य व नालंदा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार सोहळा’ पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात सोयगाव तालुक्यातील वडगाव (तिग्जी) येथील तरुण उद्योजक वसंत ईश्वर सोनवणे यांना ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले.
दरम्यान दि.०७ शनिवारी पुणे येथील पत्रकार भवन येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात सामाजिक, शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. सोयगाव तालुक्याच्या ग्रामीण भागातील वसंत सोनवणे यांनी प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून वर्धा येथे ‘हेल्प ऍग्रो’ कंपनीची स्थापना केली. “विषमुक्त शेती – विषमुक्त जीवन” या संकल्पनेतून त्यांनी पर्यावरणपूरक व शेतकरीहिताचे ऍग्रो प्रॉडक्ट्स विकसित करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला.त्यांच्या या कार्याची दखल घेत कृषी विभागाने सन २०२३ व २०२४ मध्ये त्यांना ‘युवा उद्योजक’ पुरस्काराने सन्मानित केले होते. याच कार्याची पुढील पावती म्हणून यंदा ‘महाराष्ट्ररत्न गौरव पुरस्कार’ देण्यात आला. हा पुरस्कार शास्त्रज्ञ डॉ. गीता जोशी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रा. संदीप सांगळे, लेखिका डॉ. अर्चना देसाई यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना वसंत सोनवणे यांनी मार्गदर्शक जयदीप व्यास, अनंत प्रधान, शिवाजी नारकर, वडील ईश्वर सोनवणे, आई शोभाबाई सोनवणे, भाऊ अमोल सोनवणे, पत्नी प्रिती सोनवणे व कु. पायल पवार यांचे आभार मानले. या पुरस्काराबद्दल अंजनाई गोशाळा आमखेडाचे अध्यक्ष संदीप इंगळे, नितीन सोमवंशी, जितेंद्र पवार, नितेश सोमवंशी, मच्छिंद्र सोनवणे व वर्धा येथील पांडुरंग बडगर, निलेश नेहारे, संदीप रघापहे, सागर दिघोडे आदींसह तालुका वासियांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या.
0 Comments