विश्व प्रतिष्ठित“अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप” डॉ. गौरव वर्मा यांना बहाल! सर्व क्षेत्रातून अभिनंदन!

शिर्डी ( प्रतिनिधी)-हृदयरोग उपचार क्षेत्रात मोठी भरारी मारणारे , आणि इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीच्या सुवर्णपरंपरेला नवे तेज देणारे वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. गौरव वर्मा यांना जागतिक स्तरावर मान्यता असलेली प्रतिष्ठित “अँड्रियास ग्रुएंत्झिग फेलोशिप” बहाल करण्यात आली आहे. या गौरवाने वैद्यकीय क्षेत्रात अभिमानाचा नवा मानदंड निर्माण झाला असून महाराष्ट्राच्या दृष्टीने ही मोठी आनंदाची व अभिमानाची बाब आहे.

 डॉ. गौरव वर्मा हे हृदय रोग उपचार तज्ञ असून ते घोटी जवळील एस एम बी टी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहेत. तसेच अनेक रुग्णालंयानाही ते हृदय रोग रुग्णांवर उपचारासाठी विशेष भेटी देत असतात. शिर्डी येथील साई संस्थांनच्या साईबाबा सुपर हॉस्पिटल मध्येही त्यांनी अनेक वर्ष सेवा दिली आहे. आत्तापर्यंत त्यांनी अनेक हृदयरोग रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवनदान दिले आहे.ही फेलोशिप मिळाल्याबद्दल त्यांचे शिर्डी व परिसरातूनही त्यांचे अभिनंदन होत आहे.
    इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजीचे जनक म्हणून ओळखले जाणारे डॉ. अँड्रियास ग्रुएंत्झिग यांनी मानवामध्ये पहिली कोरोनरी अँजिओप्लास्टी यशस्वीरीत्या करून हृदयरोग उपचार क्षेत्रात क्रांती घडवून आणली. त्यांच्या अद्वितीय कार्याची प्रेरणादायी परंपरा जपत दिली जाणारी ही मानाची फेलोशिप वैद्यकीय सेवेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या तज्ज्ञांना प्रदान केली जाते.
             ही प्रतिष्ठित फेलोशिप ए.सी.एल., लंडन यांच्या वतीने आयोजित सोहळ्यात प्रदान करण्यात आली. इटलीचे सुप्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अँटोनियो कोलंबो तसेच झुरिच (स्वित्झर्लंड) येथील नामांकित तज्ज्ञ डॉ. बर्नहार्ड मायर यांच्या हस्ते डॉ. वर्मा यांना हा सन्मान देण्यात आला.
या जागतिक गौरवामुळे डॉ. गौरव वर्मा यांच्या कार्याचा लौकिक अधिकच उजळला असून खऱ्या अर्थाने नावाप्रमाणे त्यांचा गौरव झाला आहे.त्यांच्या अथक सेवेमुळे हृदयरोग उपचार क्षेत्राची प्रतिष्ठा उंचावली आहे. वैद्यकीय सेवेतील त्यांच्या समर्पण, कौशल्य आणि संशोधनपर दृष्टीकोनाचा हा मानाचा शिरपेच ठरला असून संपूर्ण शिर्डी व परिसरातूनही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments