प्रवरा परिवाराशी जपली सामाजिक नाळ; डॉ. प्रशांत जानी यांच्याकडून ३६ लाखांची वैद्यकीय उपकरणे भेट



राजुरी (वार्ताहर): 
कॅनडातील 'नॉर्दर्न ऑन्टारियो स्कूल ऑफ मेडिसिन' विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. प्रशांत जानी यांनी सामाजिक बांधिलकी जपत लोणी येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा मेडिकल ट्रस्टला अत्याधुनिक ३६ लाख रूपये किंमतीच्या वैद्यकीय उपकरणांची भेट दिली आहे. आतापर्यंत डॉ. जानी यांनी गरीब रुग्णांच्या मोफत व सवलतीच्या उपचारांसाठी सुमारे दीड कोटी रुपयांची विविध उपकरणे उपलब्ध करून भारत आणि दिली आहेत.

नुकत्याच झालेल्या दोन दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान डॉ. जानी आणि त्यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, अभिमत विद्यापीठ येथील पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी पॅथॉलॉजी विभागासाठी १२ अत्याधुनिक मायक्रोस्कोप आणि रक्तातील गुठळ्या ओळखणारे 'प्रोथॉम्बिन मशीन' ही उपकरणे विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील व विश्वस्त ध्रुव विखे पाटील यांच्याकडे सुपूर्द केली.
डॉ. प्रशांत जानी यांचे प्रवरा परिवाराशी गेल्या १२ वर्षांपासूनशैक्षणिक व वैद्यकीय ऋणानुबंध असून त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत. दरवर्षी कॅनडातील डॉक्टरांना सोबत घेऊन ते येथील विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा घेतात. प्रवरा विद्यापीठाने तीन वर्षांपूर्वी त्यांना 'जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित केले आहे.
याप्रसंगी पॅथॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. सूर्यकांत डोंगरे, सीसीएल डायरेक्टर डॉ. रवींद्र कारले व इतर मान्यवर उपस्थित होते. या उपकरणांमुळे ग्रामीण भागातील गरीब रुग्णांना आता अधिक अचूक आणि जलद तपासणी सुविधा उपलब्ध होणार आहेत.

Post a Comment

0 Comments