कामाच्या ठिकाणी महिलांची सुरक्षितता हीच काळाची गरज; लोणीत 'पॉश' कायद्यावर कार्यशाळा संपन्न




राजुरी (प्रतिनिधी):
"लैंगिक छळामुळे निर्माण होणारा मानसिक ताण हा महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतो. अशा घटनांमुळे चिंता आणि नैराश्य वाढते, ज्यामुळे महिलांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. 

त्यामुळेच कामाच्या ठिकाणी महिलांना सुरक्षित वातावरण देणे आणि त्यांचे संरक्षण करणे ही केवळ कायदेशीरच नाही, तर सामाजिक आणि नैतिक जबाबदारी आहे," असे प्रतिपादन प्रसिद्ध समाजसेविका अॅड. रंजना गवांदे यांनी केले.
प्रवरा वैद्यकीय अभिमत विद्यापीठातील अंतर्गत तक्रार समितीच्या वतीने 'कामाच्या ठिकाणी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये लैंगिक छळाचे परिणाम आणि पॉश कायदा' या विषयावर विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
याप्रसंगी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. रवींद्र लावरे, समिती अध्यक्षा डॉ. अनिता मुंढे, डॉ. मोहन पवार, डॉ. वैशाली फाळके,डॉ. तेजस बोरकर, डॉ. सोनाली दास, डॉ. शिवलिला उपासे, नर्सिंग सुपरइंटेडंट डॉ. संगिता विखे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
'पॉश' कायद्याचे महत्त्व अधोरेखित करताना अॅड. गवांदे म्हणाल्या की, समाजात नीती-नियमांचे उल्लंघन होऊ लागल्यानेच कठोर कायद्यांची निर्मिती झाली आहे. प्रत्येक संस्थेत सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि समानतेवर आधारित कार्यसंस्कृती निर्माण करणे हा या कायद्याचा मुख्य उद्देश आहे. या कार्यशाळेला प्रवरा अभिमत विद्यापीठातील महिला प्राध्यापिका, परिचारिका, आणि महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तेजस बोरकर यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सचिव डॉ. हिरा जयशीला यांनी मानले.

Post a Comment

0 Comments