सोयगाव तालुक्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी पुष्पा काळे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद देण्याची जनतेतून मागणी ---




दिलीप शिंदे
सोयगाव दि. २७-- सोयगाव तालुक्याचा खरा विकास व अनुशेष भरून काढण्यासाठी आमखेडा गटाच्या भाजपाच्या नवनिर्वाचीत जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांना छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन भाजपाच्या वरिष्ठांनी सोयगाव तालुक्याला न्याय द्यावा अशी मागणी तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे. सोयगाव तालुक्याला नेतृत्वाची संधी मिळणार का हे मात्र निरुत्तरित आहे. 

 दरम्यान १९९९ सालीच्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस कडून निवडणूक लढविण्यासाठी अब्दुल सत्तार व सिल्लोड - सोयगाव मतदारसंघाचा भाग असलेल्या सोयगाव तालुक्याचे भाग्यविधाते लोकमहर्षी कै.बाबुरावजी काळे यांचे सुपुत्र रंगनाथराव काळे हे काँगेस कडून विधानसभा निवडणुक लढविण्यासाठी इच्छुक होते.तिकिटासाठी दोघांमध्ये रस्सी खेच होती उमदेवारीचा वाद दिल्ली दरबारी पोहचला त्यात रंगनाथराव काळे यांनी बाजी मारत सिल्लोड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवली. काँग्रेस ने सोयगाव तालुक्याला संधी दिली. मात्र नियतीला वेगळेच हवे होते अब्दुल सत्तार यांनी बंडखोरी करीत सिल्लोड -सोयगाव विधानसभेची निवडणूक लढवली.राष्ट्रवादीकडून प्रभाकर पालोदकर हे निवडणूक रिंगणात होते. यात रंगनाथराव काळे यांचा पराभव झाला होता. तर बंडखोरी केलेल्या अब्दुल सत्तार यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती.काँगेस उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केलेल्या अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस मध्ये पुन्हा प्रवेश करण्यासाठी सिल्लोड येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कै. गोविंदराव आदिक हे छत्रपती संभाजीनगर येथील सुभेदारी विश्राम गृहात थांबलेले होते. अब्दुल सत्तार यांना काँग्रेस मध्ये प्रवेश देऊ नये यासाठी सिल्लोड,सोयगाव येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सुभेदारी विश्राम गृह येथे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष कै. गोविंदराव आदिक यांना घेराव घातला होता.मात्र अब्दुल सत्तार व अशोकराव चव्हाण यांच्या जवळीक मुळे कार्यकर्त्यांचा विरोध झुगारून सत्तार यांना प्रदेशाध्यक्ष यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. दीड दोन वर्षाचा कालावधी लोटला आणि अब्दुल सत्तार यांना काँग्रेस कडून विधानपरिषदेची उमेदवारी मिळाली. यावेळी रंगनाथराव काळे व लघाने पाटील यांनी कोणतेही वैर न बाळगता सत्तार यांना मदत केली आणि सत्तार हे विधान परिषदेचे आमदार झाले. सोयगाव तालुक्याला पहिल्यांदा सहा महिन्यांन करिता का होईना रंगनाथराव काळे यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळत नेतृत्वाची संधी मिळाली. त्यानंतर मात्र कोणत्याही पक्षाने सोयगाव तालुक्याला नेतृत्व करण्याची संधी दिली नसल्याने सोयगाव तालुक्याचा अनुशेष भरून निघाला नाही. जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची कमतरता, आरोग्य विषयक अडचणी,औषधींचा तुटवडा,पंचायत समिती,तहसील कार्यालय,कृषी,भूमिअभिलेख,सामाजिक वनीकरण,वन विभाग,पाटबंधारे,लघु पाटबंधारे व इतर शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्यांची कमतरता, कर्मचारी स्थानिक ठिकाणी राहत नसल्याने नागरिक,शेतकरी यांना निर्माण होणाऱ्या अडचणी याकडे लक्ष देण्यासाठी लोकप्रतिनिधींना वेळ नाही केवळ मोठमोठ्या बिल्डिंग बांधून स्वविकास साधत असल्याची चर्चा जनतेत सध्या सुरू आहे. राज्यात भाजपा व शिवसेना (शिंदे गट) गुण्या गोविंदाने नांदत असून सिल्लोड -सोयगाव मतदार संघात मात्र भाजपा व आमदार अब्दुल सत्तार (शिवसेना शिंदे गट) यांच्यातून विस्तव ही जात नसल्याने स्थानिक ठिकाणी कार्यकर्त्यांची गोची झाली आहे. पुष्पा काळे यांच्या रूपाने भाजपाला कर्तृत्वान चेहरा मिळाला आहे. आमदार अब्दुल सत्तार यांची सोयगाव तालुक्यातील मतदारांवरची पकड ही विधानसभा निवडणुकीपासूनच घसरत चालली आहे. याचा प्रत्यय जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत पुन्हा सिद्ध झाला आहे. भाजपाचा तालुक्यात जनाधार वाढला असून आमदार अब्दुल सत्तारांना परखड विरोध करणाऱ्या कार्यकर्त्यांची कामे व्हावी व सत्तारांना शह देण्यासाठी ,तालुक्याच्या विकासासाठी आमखेडा गटाच्या भाजपाच्या नवनिर्वाचीत जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांना जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून केली जात आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्व सोयगाव तालुक्याला न्याय देतात की सोयगाव तालुक्यावर अन्याय करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

चौकट:- भाजपा शिवसेना (शिंदे गट) यांना जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमत मिळाले आहे.जिल्हा परिषद अध्यक्ष हा भाजपाचा होईल अशी चर्चा सुरू आहे. सोयगाव तालुक्याला नेतृत्वाची संधी मिळावी यासाठी पुष्पा काळे यांना जिल्हा परिषद अध्यक्षपद मिळावे अशी मागणी तालुका वासियांकडून केली जात आहे. मतदारसंघात भाजपा व आमदार अब्दुल सत्तार यांचे सख्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. सत्तार हे मुरब्बी राजकारणी असल्याने मतदारसंघात सक्षम विरोधक निर्माण होऊ नये यासाठी ते प्रयत्नशील राहतील अशी चर्चा जनतेत रंगली आहे.पुष्पा काळे यांची जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी वर्णी लागणार किंवा नाही हे मात्र सद्या निरुत्तरित आहे.

Post a Comment

0 Comments