श्रीरामपुरात एकाच कुटूंबातील चौघांवर अंत्यसंस्कार; तिघांची मृत्यूशी झुंज सुरू



दिलीप लोखंडे 

टाकळीभान प्रतिनिधी-अवघ्या काही वेळापूर्वी घरात हास्यविनोद सुरू होते... देव दर्शनाला जायची लगबग होती... आनंदाने सहकुटुंब कारमध्ये बसून खंडाळ्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. पण, नियतीला काही वेगळेच मान्य होते. श्रीरामपूर संगमनेर रस्त्यावरील एसटी कार्यशाळेजवळ एका भीषण अपघाताने चव्हाण कुटुंबाचे हसते खेळते घर उद्धस्त केले. आज एकाच स्मशानभूमीत, एकाच वेळी चार सरण रचले गेले आणि
ते पाहून उपस्थितांच्या काळजाचे पाणी झाले.

बुधवारी (ता. २५) दुपारी सव्वाचार वाजेच्या सुमारास हॉटेल व्यावसायिक अशोक व रमेश चव्हाण यांचे कुटुंबीय कारने खंडाळ्याला दर्शनासाठी निघाले होते. प्रवासाला सुरुवात होऊन
काहीच मिनिटेच झाली असताना एस. टी. कार्यशाळेजवळ समोरून येणाऱ्या ट्रक लाकारची भीषण धडक झाली. या धडकेत प्रशांत रमेश चव्हाण (२४), सिद्धार्थ सुनील चव्हाण (१६) आणि ऐश्वर्या अशोक चव्हाण (२६) यां चा जागीच करुण अंत झाला. उपचारादरम्यान संगीता अनिल चव्हाण (४०) यांचीही प्राणज्योत मालवली. काल (ता. २६) शवविच्छेदनानंतर चारही मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाईक व मित्रपरिवाराने
जड अंतःकरणाने या चौघांना अखेरचा निरोप दिला. एकीकडे चौघांवर अंत्यसंस्कार झाले असताना, दुसरीकडे कुटुंबातील इतर तीन सदस्य मृत्यूशी झुंज देत आहेत. सारिका अनिल चव्हाण (३०) यांच्यावर प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुद्र (६) व ऋत्वी अशोक चव्हाण (३.५) या दोन निरागस चिमुकल्यांना नाशिक येथील रुग्णालयात हलवण्यात आले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

Post a Comment

0 Comments