अजिंठा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या टिटवी कालिका गड या जंगल भागात फटाका फोडल्याचा फेसबुकवर व्हिडिओ व्हायरल, डॉ.संतोष पाटील यांची कारवाईची मागणी --




दिलीप शिंदे 
सोयगाव दि.२७-- अजिंठा वनपरिक्षेत्रा अंतर्गत असलेल्या टिटवी कालिका गड येथील जंगलात शाम चितळे नामक व्यक्तीने फटाका फोडल्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला आहे. फेसबूकवर व्हिव ची संख्या वाढावी यासाठी वनसंपदा धोक्यात घालण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी शाम चितळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी जैवविविधता संवर्धनाचे राज्यभर कार्य करणारे डॉ.संतोष पाटील यांनी उप वनसंरक्षक सुवर्णा माने यांच्याकडे केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

        याबाबत सविस्तर माहिती अशी की, शाम चितळे नामक व्यक्तीने अजिंठा वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या टिटवी कालिका गड च्या जंगलात तोफे सारख्या वस्तूमध्ये फटाका फोडल्याचा व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल केला आहे. उन्हाळ्याचे दिवस असून ज्याठिकाणी फटाका फोडला त्याठिकाणी आजूबाजूला सुकलेले गवत होते.फटाका फुटल्याने त्याच्या चिंगऱ्यांमुळे जर आग लागली असती तर मोठी वनसंपदासह वन्यजीवांचा जीव धोक्यात आला असता. छत्रपती संभाजीनगर पासून शंभर सव्वाशे किलोमीटर अंतरावर असलेला सावळदबारा हा अतिदुर्गम भाग आहे. लागलेली आग विझविण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न करून देखील यश आले नसते. वनसंपदा धोक्यात येईल असे कृत्य जंगलात करणे हा कायद्याने गुन्हा असताना देखील शाम चितळे या व्यक्तीने जंगलात फटाका फोडल्याचे हे कृत्य केले आहे. याप्रकरणी शाम चितळे यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी डॉ.संतोष पाटील यांनी सुवर्णा माने उप वनसंरक्षक छत्रपती संभाजीनगर यांच्याकडे केली आहे. तात्काळ कारवाई न झाल्यास उपवनसंरक्षक कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे आमरण उपोषण करणार असल्याचे डॉ. संतोष पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. दरम्यान वनविभागाचे वनरक्षक कर्तव्याच्या ठिकाणी राहत नसल्याने वनसंपदा धोक्यात आली आहे. अनेक ठिकाणी वनविभागाच्या हद्दीतून गौण खनिज वाहतूक केली जात आहे,वृक्षांची अवैध रित्या तोड करून वीट भट्ट्यांमध्ये सर्रास वापर केला जात आहे. उपवनसंरक्षक सुवर्णा माने या गंभीर प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments