दिलीप शिंदे
सायगाव दि.२६-- महाराष्ट्र सरकारने जुलै २०२५ पासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ लागू केली आहे. आमखेडा येथील रहिवासी असलेल्या उर्मिला संदीप इंगळे (दिव्यांगत्व ६२% ) यांना अद्यापपर्यंत वाढीव मानधन मिळाले नसून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार दि.२३ सोमवारी दिव्यांग कल्याण सचिव तुकाराम मुंढे यांच्या सह जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांच्याकडे केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, मी ६२% शारीरिक दिव्यांगत्व असून माझी आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून माझा उदरनिर्वाह शासनाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत मिळणाऱ्या मानधनावर अवलंबून आहे.महाराष्ट्र शासनाने जुलै २०२५ पासून संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग लाभार्थ्यांच्या मानधनामध्ये वाढ लागू केली होती. संजय गांधी आहे. राज्यातील इतर जिल्हे व तालुक्यांमध्ये लाभार्थ्यांना वाढीव मानधनाचा लाभ मिळत असताना, सोयगाव तहसील कार्यालयातील संबंधित विभागाच्या हलगर्जीपणा व दुर्लक्षामुळे मला आजपर्यंत वाढीव मानधनाचा लाभ मिळालेला नाही.मी वेळोवेळी तहसील कार्यालयात जाऊन माझे आधार कार्ड, ओळखपत्र, दिव्यांग प्रमाणपत्र, बँक पासबुक इत्यादी सर्व आवश्यक कागदपत्रे सादर केलेली आहेत. तरीदेखील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिणामी, जुलै २०२५ पासूनची वाढीव मानधनाची रक्कम मला आजतागायत मिळालेली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून दिव्यांगांच्या हक्कांवर गदा आणणारी आहे. दिव्यांग कल्याण सचिव म्हणून दिव्यांगांच्या हक्कांचे रक्षण व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी कटिबद्ध आहात, ही राज्यभर प्रसिद्ध बाब आहे. त्यामुळे माझ्या प्रकरणात आपण तात्काळ हस्तक्षेप करून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, जुलै २०२५ पासूनची वाढीव मानधनाची संपूर्ण थकित रक्कम मला तात्काळ अदा करण्यात यावी व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. त्यामुळे भविष्यात कोणत्याही दिव्यांग लाभार्थ्याला अशा प्रकारे त्रास होणार नाही असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दिव्यांग कल्याण सचिव तुकाराम मुंढे या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देऊन दिव्यांग महिलेला न्याय देणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments