भिल्ल समाज नगर मनमाड महामार्ग उद्या अडवणार-ज्ञानेश्वर अहिरे .उपोषण कर्त्या आदिवासी महिलांची तब्येत खालावली



राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसलेल्या आदिवासी भिल्ल समाजाच्या महिलांची तब्येत खालावली आहे.त्यामुळे भिल्ल समाज प्रचंड आक्रमक झाला असून उद्या रविवार ८ फेब्रुवारी रोजी नगर मनमाड महामार्ग राहुरी येथे अडवून पोलीस प्रशासनाला जाब विचारला जाईल असा इशारा आदिवासी बचाव समितीचे संस्थापकीय सदस्य ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
        आदिवासी बचाव समितीचे संस्थापकीय सदस्य शिवाजीराव गांगुर्डे, कैलास माळी, दिलीप बर्डे, भास्कर बर्डे यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांची समक्ष भेट घेऊन निवेदन दिले. त्यात त्यांनी म्हटले आहे की, राहुरी तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसापासून करजगाव येथील अन्यायग्रस्त महिला उपोषणास बसल्या आहेत परंतु पोलीस प्रशासनाने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे या महिलांची तब्येत खालवली आहे सदर उपोषणा मध्ये केलेल्या मागण्या अतिशय रास्त आहेत. करजगाव मध्ये आदिवासी भिल्ल समाजाच्या महिला व पुरुषांवर प्राण घातक हल्ला करण्यात आला. त्यानंतर तीन दिवसांनी पोलिसांनी आदिवासींची फिर्याद घेतली . गुन्हा दाखल झाला परंतु सदर आरोपी गावात मोकाट फिरत असून त्यांच्याकडून फिर्यादी कुटुंबाला धोका आहे. तसेच ज्या महिलांवर हल्ला झाला त्यांचे जबाब अद्याप नोंदवले गेलेले नाहीत व वाढीव कलम लावण्यात आलेले नाही. हाच मुद्दा घेऊन तहसील कार्यालयासमोर करजगाव येथील आदिवासी महिला तीन दिवसापासून उपोषणास बसल्या आहेत. परंतु पोलिसांनी किंवा तहसीलच्या कोणत्याही अधिकाऱ्याने त्यांची साधी विचारपूस देखील केलेली नाही एवढा गंभीर गुन्हा असतानाही पोलीस आरोपींना अटक करत नाहीत आदिवासी महिलांचा विनयभंग होऊन त्यांच्यावरप्राणघातक हल्ला झाला. परंतु पोलिसांनी केवळ मारहाणीचेच कलम लावले आहे पोलिसांनी आदिवासी महिलांचे जबाब घेऊन विनयभंग तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न यासारखे गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते . पोलिसांचा आदिवासींविरुद्ध असलेला रोष यामधून जाणवत आहे तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणकर्त्या आदिवासी महिलांची तब्येत खालावली आहे. त्यामुळे या महिलांच्या मागण्या मान्य कराव्यात या मागणीसाठी रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी नगर मनमाड महामार्ग राहुरी बस स्टॅन्ड समोर आदिवासी बचाव समितीच्या वतीने बेमुदत अडवला जाईल व याची संपूर्ण जबाबदारी राहुरी पोलिसांवर राहील असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments