शिवसेनेच्या मंत्र्यांकडून प्रचारादरम्यान लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचा पुनरुच्चार, लाडक्या बहिणींना धमकी! तर नाहीना,चर्चेला उधाण -




दिलीप शिंदे 
सोयगाव दि. ०६-- सोयगाव तालुक्यातील तीन जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या सहा गणांसाठी एकूण ८७७१७ मतदार दि. ०७ शनिवारी मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सत्तेत सहभागी असलेल्या भाजप व शिवसेने मध्येच आमखेडा व फर्दापूर गटात खरी चुरस निर्माण झाली आहे. गोंदेगाव गटात निष्ठावान शिवसैनिक एकवटल्याने शिवसेनेने (उबाठा) प्रचारात आघाडी घेतली असून मतदारांमध्ये ठाकरेंवर विश्वास दाखविला जात आहे.

मात्र मतदार मतदानातून कौल कुणाला देणार हे मात्र निरुत्तरित आहे. आमखेडा गटात भाजपकडून माजी जिल्हा परिषद सदस्या पुष्पा काळे यांच्या विरोधात गोंदेगाव गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या (मोनाली पिता राजेंद्र राठोड) या मोनाली अनिलकुमार पवार या नावाने निवडणूक लढवित आहे.तर बहुजन समाज पक्षाच्या उर्मिला संदीप इंगळे या मैदानात उतरल्या आहेत. मोनाली अनिलकुमार पवार या बाहेरील उमेदवार असल्याचा मुद्दा चर्चेत आला आहे. आमखेडा गटाची खरी लढत भाजप शिवसेनेत असल्याने प्रचारात भाजपाच्या उमेदवार पुष्पा काळे यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याचे दिसून येत आहे. मात्र विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे येणाऱ्या नऊ तारखेला स्पष्ट होणार आहे. फर्दापूर गटात भाजपकडून अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस मुलतानी यांची मुलगी माहिन इद्रिस मुलतानी ही निवडणूक लढवित असून शिवसेना शिंदे गटाकडून प्रभावती दारासिंग चव्हाण तर वंचित बहुजन आघाडीकडून देवकाबाई निलेश राठोड या निवडणूक रिंगणात आहेत. शिवसेनेचे व वंचित चे उमेदवार बंजारा समाजाचे तर भाजपच्या उमेदवार मुस्लिम असल्याने चुरस वाढली आहे. माहिन मुलतानी या बाहेरील उमेदवार असल्याची चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे. इद्रिस मुलतानी यांचा दांडगा जनसंपर्क व काम करण्याची पध्दत धडक असल्याने मतदारांमध्ये त्यांच्याविषयी भावना निर्माण झाली आहे. फर्दापूर व आमखेडा गटात शिवसेनेने बंजारा उमेदवार दिल्याने जातीय समीकरणामुळे निवडणूक लढवित असलेल्या उमेदवारांना याचा फटका बसू शकतो अशी चर्चा जनतेत रंगली आहे. गोंदेगाव गटात पाच उमेदवार रिंगणात असल्याने या ठिकाणी काट्याची लढत होणार आहे. शिवसेना विभागली गेल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे. गोंदेगाव गटात एक हाती सत्ता ठेवणारे शिवसेनेचे (उबाठा) जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांची आमदार अब्दुल सत्तार यांच्याशी असलेली जवळीक मुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राजेंद्र राठोड यांच्या मुलीला आमदार अब्दुल सत्तार यांनी शिवसेनेकडून तिकीट दिल्याकारणाने राजेंद्र राठोड यांनी धनुष्यबाण हाती घेतल्याने गोंदेगाव गटात शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का बसला आहे. गोंदेगाव गटातील निष्ठावंत शिवसैनिक (उबाठा) एकवटल्याने गटात व बनोटी गणात मशाल पेटणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चौकट - जिल्हा परिषद निवडणुकीत विकासावर मत मागणाऱ्या सत्तेतील भाजप व शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारांच्या प्रचारासाठी शिवसेनेला कॅबिनेट मंत्री व पाचोऱ्याचे आमदार यांची सभा घ्यावी लागल्याने मोठी चुरस वाढली आहे. जरंडी येथे शिवसेनेच्या उमेदवार मोनाली अनिलकुमार पवार यांच्या सभेत पाणी पुरवठा मंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी जो पर्यंत एकनाथ शिंदे आहेत तो पर्यंत लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे सांगितले. प्रत्येक निवडणुकीत सत्ताधाऱ्यांकडून लाडकी बहीण योजना बंद होणार नाही असे वारंवार म्हटले जात आहे.योजना बंद करणार कोण याचे स्पष्टीकरण मात्र सभेत कुणी देत नाही. निवडणुकी दरम्यान लाडक्या बहिणींचा पुनरुच्चार केला जातो मात्र स्थानिक समस्यांवर कुणी बोलायला तयार नाही.त्यामुळे आम्हाल जर मतदान केले नाही तर लाडक्या बहिणींची योजना बंद होऊ शकते अशी धमकी! तर शिवसेना देत नाहीना अशी चर्चा मतदारांमध्ये रंगली आहे. सत्तेतील भाजप व शिवसेना हे एकत्र नांदत आहेत निवडणुकीत समोरासमोर उभे ठाकले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणी कुणाच्या बाजूने कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

-- गट व गण निहाय मतदारांची संख्या -- 

पंचायत समिती गण - फर्दापूर एकूण मतदार - १५४३३
पंचायत समिती गण - सावळदबारा एकूण मतदार - १५६००
जिल्हा परिषद गट - फर्दापूर एकूण मतदार - ३१०३३
पंचायत समिती गण - आमखेडा एकूण मतदार - ११७६६
पंचायत समिती गण - निंबायती एकूण मतदार - १४१६८
जिल्हा परिषद गट - आमखेडा एकूण मतदार - २५९३४
पंचायत समिती गण - गोंदेगाव एकूण मतदार १६५१३
पंचायत समिती गण - बनोटी एकूण मतदार १४२३७
जिल्हा परिषद गट - गोंदेगाव एकूण मतदार - ३०७५०

Post a Comment

0 Comments