अजितदादा पवारांच्या नियोजित स्मारक स्थळास "अजित गड" या नावाने संबोधावे दिपकराजे शिर्के यांची मागणी




पुणे (प्रतिनिधि): देशाचे नेते, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेबांचे नुकतेच बारामती येथे विमान दुर्घटनेत दुःखद निधन झाल्याने देशभरासह राज्यभरात हळहळ व्यक्त होत असून, सर्व निष्ठावंत पदाधिकारी, कार्यकर्ते दुःखाने व्याकुळ झाले असतानाच आता अजितदादांच्या नियोजित स्मारका बाबतही चर्चा होताना दिसत आहे. त्यातच राष्ट्रवादीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष, ऐतिहासिक राजेशिर्के घराण्याचे ( महाराणी येसुबाईंचे ) वंशज दिपकराजे शिर्के यांनी नियोजित स्मारक स्थळास म्हणजेच स्मारक परिसरास "अजित गड" या नावाने संबोधावे अशी भावनिक मागणी केली आहे.


*लोकप्रिय लोकनेते तथा लोकनायक राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेबांचे राजकीय, सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक, क्रीडा, धार्मिक आदींसह महाराष्ट्राच्या जडणघडणीत व विकासासाठी खुप मोठे योगदान असल्याने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा देशातील एकमेव असा राजकीय पक्ष आहे की, ज्यांनी आमच्या सारख्या गडदुर्ग संवर्धकांच्या मागणीनुसार छत्रपतींच्या गडकिल्ल्यांचा इतिहास अवघ्या जगाला माहिती व्हावा तसेच छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शंभुराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक ऐतिहासिक वास्तु, गडकिल्ल्यांचे संवर्धन होण्याच्या दृष्टीने.. "राष्ट्रवादी गडकिल्ले संवर्धन सेल" सुरू करून राज्यातील गडकिल्ले संवर्धन कार्य हाती घेतले होते.*
*तसेच छत्रपती संभाजीराजांच्या जीवनातील प्रमुख पंचस्थळांचे सुशोभिकरण करून शंभुराजांचे भव्य स्मारक साकारण्यासाठी जन्मस्थळ किल्ले पुरंदर , युद्धस्थळ कसबा संगमेश्वर , शौर्यस्थळ पेडगांव किल्ले धर्मवीरगड , बलिदानस्थळ तुळापूर, समाधी स्थळ वढू बुद्रुक येथे देखील अजितदादांनी अर्थमंत्री या नात्याने करोडो रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. तर काही ठिकाणी कामेही सुरू झाली आहेत. दादांची किल्ल्यांबद्दल असलेली अस्मिता प्रेम पाहता त्यांच्या होणाऱ्या नियोजित स्मारक स्थळास अथवा स्मारक परिसरास "अजित गड " असेच नामकरण करण्याची मागणी आता कार्यकर्ते पदाधिकारी करू लागले आहेत. तशी अधिकृत मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष व गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष, शंभुसेना प्रमुख मा. दिपकराजे शिर्के यांनी केली आहे. लवकरच उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचे दिपकराजे शिर्के यांनी म्हंटले आहे.*

Post a Comment

0 Comments