अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी तालुक्यातील करजगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना घडली असून आदिवासी भिल्ल समाजातील महिला व अल्पवयीन मुलींवर प्राणघातक हल्ला करून त्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत अनेक महिला, लहान मुले व पुरुष गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालय, अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.
करजगाव येथील गट नंबर २८ मधील जमीन भिल्ल समाजाने गेल्या ५० ते ६० वर्षांपासून अतिक्रमण करून कसत असल्याचे सांगितले जाते. या ठिकाणी गावातील काही लोक जमा झाल्याचे पाहून आदिवासी कुटुंबीयांनी विचारपूस करण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी जमावाने थेट आदिवासी कुटुंबावर प्राणघातक हल्ला चढवला या हल्लेखोरांनी फावडे, कोयते, लोखंडी सळई व लाकडी दांड्यांच्या सहाय्याने महिला, लहान मुले, अल्पवयीन मुली व कुटुंबातील सदस्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली. महिलांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले, तर अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोप आहे. हल्ल्यादरम्यान जीव वाचवण्यासाठी महिला व अल्पवयीन मुली घरात लपल्या असतानाही जमावातील गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दरवाजे तोडून घरात प्रवेश केला. महिलांचा विनयभंग करताना जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली तसेच घरे पाडून टाका, घरे पेटवून द्या असे एकमेकांना चिथावणीखोर आवाहन करण्यात आले.
एवढा गंभीर गुन्हा घडूनही राहुरी पोलिसांनी अद्याप कोणताही गुन्हा दाखल न केल्याने संपूर्ण जिल्ह्यातील भिल्ल समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आदिवासी बचाव समितीच्या सदस्यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात जाऊन पीडितांची भेट घेतली व त्यांना दिलासा दिला.
आरोपींवर तात्काळ कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आदिवासी बचाव समितीचे संस्थापक सदस्य ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला. यावेळी शिवाजीराव गांगुर्डे, कैलास दादा माळी, सुभाष पवार, शिवाजी जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments