राहुरी पोलीस स्टेशनचा कारभार पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे आल्यापासून राहुरी तालुक्याची कायदा सुव्यवस्था ढासाळली असून भिल्ल समाजाच्या न्याय हक्कासाठी लवकरच राहुरी पोलीस ठाण्यावर भिल्ल समाजाचा गलोल मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
श्री. अहिरे यांनी निवेदनात म्हटले आहे की, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी राहुरी पोलीस स्टेशनचा पदभार हातात घेतल्यापासून अवैद्य धंदे तसेच गुन्हेगारी याच्यामध्ये भरमसाठ वाढ झाली आहे. तसेच अन्याय अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढला असून अन्यायग्रस्त नागरिकांची देखील दखल घेतली जात नाही. तसेच परस्पर तडजोडी करून गुन्हा दडपण्याचा प्रकार या पोलीस स्टेशनमध्ये उघड सुरू आहे. तालुक्यातील करजगाव येथे भिल्ल समाजाच्या महिलांवर प्राण घातक हल्ला करण्यात आला . तसेच अल्पवयीन मुलींचा विनयभंग करण्यात आला व लहान मुलांना फरपटत घराच्या बाहेर फेकले व पुरुषांनाही जबर मारहाण करण्यात आली. हा प्रकार घडून दोन दिवस झाले तरी राहुरी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही. सध्या या महिला जिल्हा शासकीय रुग्णालय येथे उपचार घेत आहेत अतिशय घृणास्पद व माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली असतानाही पोलीस नेमके कुणाच्या दबावाखाली आहेत? की पोलिसांना भिल्ल समाजाला न्याय द्यायचाच नाही? की पोलिसांना हे प्रकरण दडपवायचे आहे ?असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे पोलीस स्टेशनवर नियंत्रण राहिलेले नाही येथील बहुतेक कर्मचारी केवळ हफ्ते खोरी करताना दिसतात व गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. करजगाव येथील आदिवासी महिला सध्या रुग्णालयामध्ये अतिशय गंभीर स्वरूपात जखमी अवस्थेत ऍडमिट आहेत परंतु पोलीस कोणतीही कारवाई करत नाहीत त्यावरून असे सिद्ध होते की राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. २४ तासाच्या आत राहुरी पोलिसांनी भिल्ल समाजावर झालेल्या अन्यायाची त्वरित दखल घ्यावी व करजगाव येथील आरोपींवर गुन्हा दाखल करावा व त्यांना अटक करावी अन्यथा तालुक्यातील सर्व भिल्ल समाज एकत्र येऊन राहुरी पोलीस ठाण्यावर कोणत्याही क्षणी गलोल मोर्चा घेऊन येईल व होणाऱ्या परिणामास राहुरी पोलीस स्टेशनच जबाबदार राहील असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
0 Comments