श्रीरामपूर - महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या वादळाची चाहूल लागली आहे. मराठा आणि राजपूत समाजाला एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष डॉ. राज शेखावत आणि आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी श्रीरामपुरातून रणशिंग फुंकले आहे. "जर प्रस्थापित पक्षांनी आमची उपेक्षा थांबवली नाही, तर करणी सेना स्वतःचा राजकीय पक्ष काढून निवडणुकीच्या रिंगणात उतरेल," असा खणखणीत इशारा करणी सेनेचे अध्यक्ष शेखावत यांनी दिला आहे.
श्रीरामपूर येथे आयोजित 'मराठा-राजपूत क्षत्रिय महासंमेलना वेळी बोलतांना त्यांनी मराठा आणि राजपूत समाजाच्या मागण्यांची '१२ सूत्री सनद' मांडली. ज्यात प्रामुख्याने आरक्षणात वाढ करून ईडब्ल्यूएस आरक्षण १०% वरून २०% करावे आणि ओबीसीप्रमाणे सवलती मिळाव्यात. अग्निवीर ही योजना रद्द करून जुन्या पद्धतीची लष्कर भरती आणि पेन्शन योजना लागू करा. शेतकऱ्यांच्या सर्व पिकांना MSP कायदा लागू करावा. महाराणा प्रताप, संभाजी महाराज, पृथ्वीराज चौहान यांचा इतिहास पाठ्यपुस्तकात सविस्तर समाविष्ट करावा. गड-किल्ले संवर्धन करून क्षत्रियांच्या ऐतिहासिक वारशाचे जतन करावे. आमच्या पूर्वजांनी अखंड भारत घडवला, मात्र आज राजकीय क्षेत्रात क्षत्रियांची घोर उपेक्षा होत आहे," अशी खंत व्यक्त करत शेखावत यांनी कांशीराम यांच्या 'जितकी ज्यांची संख्या, तितका त्यांचा वाटा' या सूत्राचा पुनरुच्चार केला. गुजरात, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील यशानंतर आता महाराष्ट्रात गावोगावी जाऊन मराठा-राजपूत समाजाला जागे करणार असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या राजकीय पक्षांवर तोफ डागताना शेखावत म्हणाले की, "आम्ही कोणत्याही पक्षाचे गुलाम नाही. जिथे आमचा सन्मान होईल, तिथेच आम्ही असू. जर न्याय मिळाला नाही, तर मराठा-राजपूत उमेदवार उभे करून किंवा अपक्षांना पाठिंबा देऊन आम्ही आमची ताकद दाखवून देऊ." असा इशारा डॉक्टर शेखावत यांनी दिल्याने आगामी निवडणुकांमध्ये मराठा-राजपूत समीकरण राज्याला पहायला मिळू शकते. तर आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले पाटील यांनीही आरक्षणासह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. "मराठा आणि राजपूत हे दोन्ही समाज क्षत्रिय असून, यापुढे सामाजिक आणि व्यवसायीक दृष्ट्या समाजाला बळकट करण्यासाठी आम्ही एकत्रित काम करू," असा निर्धार डॉक्टर कृषिराज टकले पाटील यांनी व्यक्त केला. तसेच आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ ही संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी निगडित नसून ती एक अराजकीय चळवळ आहे. महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास साक्ष असून, राजपूत आणि मराठा हे दोन्ही क्षत्रिय समाज आहेत. त्यामुळे करणी सेनेप्रमाणेच आता स्वाभिमानी मराठा महासंघही क्षत्रिय एकजुटीसाठी काम करेल, असे त्यांनी सांगितले. आरक्षणाच्या लढ्यातील आपल्या योगदानाचा उल्लेख करताना डॉक्टर कृषिराज टकले पाटील म्हणाले,की "गेल्या २० वर्षांपासून मी आरक्षणाच्या चळवळीत आहे. २०१३ मध्ये नगरला झालेल्या आंदोलनात मला एक महिना तुरुंगवासही भोगावा लागला होता. त्या आंदोलनानंतरच नारायण राणे समितीने सकारात्मक अहवाल दिला होता, ज्यामुळे मराठा समाज मागास असल्याचे सिद्ध झाले होते" ही आमच्या पुढील लढ्यासाठी जमेची बाजू असून. समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाचे संस्थापक डॉक्टर कृषीराज टकले पाटील यांनी व्यक्त केली. श्रीरामपूर येथे संपन्न झालेल्या या ऐतिहासिक क्षत्रिय महामेळाव्याप्रसंगी इतिहास आघाडी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेंद्र निंबाळकर, तसेच स्वाभिमानी मराठा महासंघाचे पदाधिकारी रविंद्र पडवळ, सुभाष गागरे, भानुदास वाबळे, शिवशंभू जांभळे, शशिकांत पाटील आदी मान्यवरांसह मराठा आणि क्षत्रिय राजपूत बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. मराठा आणि राजपूत नेत्यांच्या या एकत्रीकरणामुळे आगामी काळात राज्यातील सामाजिक समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0 Comments