जरंडी ग्रा.प.ने दिले पाझर तलावातून मुरूम वाहतूक करण्याचे नाहरकत प्रमाणपत्र, ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे चा प्रताप---



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि. 08 - जिल्हा परिषद लघु पाटबंधारे यांच्या अंतर्गत असलेल्या जरंडी शिवारातील चिमनापूर पाझर तलावातून जरंडी शिवारातील गट क्र.298 मधील प्लाटींग मध्ये मुरूम वाहतूक करण्यासाठी जरंडी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी चक्क तहसीलदार यांना नाहरकत प्रमाणपत्र दिल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. 


नाहरकत प्रमाणपत्रावर जरंडी ग्रामपंचायत चे सरपंच व ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या स्वाक्षऱ्या असल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
     याबाबत सविस्तर माहिती अशी, नय्युम शहा हाजी पाशा शहा रा.बरकत नगर,परळी जि. बीड यांनी तहसीलदार तथा ता.दंडाधिकारी सोयगाव यांच्याकडे जरंडी शिवारातील चिमनापूर पाझर तलावातून 20 ब्रास मुरूम जेसीबी क्रमांक एम.एच.20 जीके 7157 च्या साहाय्याने उत्खनन करून एम.एच.19 सीवाय 1474, एम.एच.20 जीएफ 1349, एम.एच.20 जीई 7364, एम.एच.20 इसी 8020, एम.एच.20 जीके 6973, एम.एच.20 जीके 7914, या ट्रॅक्टरद्वारे वाहतूक करून जरंडी शिवारातील गट क्रमांक 298 मधील प्लॉटिंग मध्ये वाहतूक करण्यासाठी अर्ज दाखल केला. सदरील अर्जासोबत जरंडी ग्रामपंचायत चे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी म्हणून पुरस्कार मिळालेले सुनील मंगरुळे यांनी चक्क जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या जरंडी येथील चिमनापूर पाझर तलावातून मुरूम वाहतूक करण्यासाठी जरंडी ग्रामपंचायत कडून तहसीलदार सोयगाव यांना नाहरकत प्रमाणपत्र दिले.नाहरकत प्रमाण पत्रावर जावक नंबर नसून सरपंच व ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या नाहरकत प्रमाणपत्र आधारे सोयगाव तहसिल कार्यालयाकडून 20 ब्रास मुरूम चे दि.28 जानेवारी रोजी 14300 रु चलन नय्युम शहा यांनी बँक ऑफ महाराष्ट्र शाखा सोयगाव येथे भरले त्या आधारे 20 ब्रास मुरूम वाहतूक करण्याची परवानगी दिली मात्र नय्युम शहा याने जरंडी शिवारातील चिमनापूर पाझर तलावातून  गट क्रमांक 298 मध्ये जवळपास 400 ते 500 ब्रास च्या जवळपास जेसीबीच्या साहाय्याने मुरूम उत्खनन करून वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती महसुलच्या गौनखनिज भरारी पथकाला दि.31 जानेवारी रोजी देण्यात आली. मात्र घरका भेदी लंका ढाये या म्हणी प्रमाणे गौनखनिज माफियांना पूर्व सूचना मिळाल्याने जेसीबी व ट्रॅक्टरे घेऊन पसार झाले. महसूल च्या भरारी पथकाने गट क्रमांक 298 मध्ये वाहतूक करण्यात आलेल्या मुरूमचा पंचनामा केला.त्याच दिवशी सायंकाळी गट क्र 298 मधील मुरूम पसरविण्यात आला. त्यामुळे महसूल विभागाला गौनखनिज माफिया जुमानत नाही किंवा महसूल विभागच माफिया तयार करीत असल्याची शंका सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केली जात आहे. दरम्यान  दंडात्मक कार्यवाही कुणावर केली हे मात्र गुलदस्त्यात असल्याने शासकीय अधिकारी पदाचा दुरुपयोग करीत गौनखनिज माफियांच्या मदतीने शासकीय मालमत्तेवर डल्ला मारून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल घशात घालत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे.उपविभागीय अधिकारी सिल्लोड व जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर यांच्या दुर्लक्षामुळे हा सर्व अलबेल सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे. उपविभागीय अधिकारी सिल्लोड व जिल्हा अधिकारी चौकशी करून काय कार्यवाही करतात या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.
         आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार प्राप्त व जरंडी ग्रामपंचायत चे ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे हे सरपंच व सदस्यांना अंधारात ठेवून मनमानी कारभार करीत असल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे.नाहरकत प्रमाण पत्रा बाबत भ्रमणध्वनीद्वारे जरंडी ग्रामपंचायत चे सरपंच यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून नाहरकत प्रमाणपत्र बाबत विचारणा केली असता त्या नाहरकत प्रमाणपत्रावर मी स्वाक्षरी केलेली नसल्याचे जरंडी ग्रामपंचायत च्या सरपंच यांनी सांगितले. तर त्या प्रमाणपत्रावर सरपंच म्हणून कुणाची स्वाक्षरी घेण्यात आली किंवा आर्थिक व्यवहारातून ग्रामविकास अधिकारी सुनील मंगरुळे यांनी तर ती खोटी स्वाक्षरी केलेली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. जरंडी सरपंच व ग्रामपंचायत सदस्य  प्रकरणाबाबत काय भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments