आजचे खेळाडू उद्याचे देशाचे प्रतिनिधी ; डॉ. सुजय विखे पाटील

शिर्डी ( प्रतिनिधी)

कोकमठाण येथे ६९ वी शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील कबड्डी स्पर्धा उत्साहात सुरू; देशभरातून २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांचा सहभाग

खेळभावना, शिस्त आणि जिद्दीच्या बळावर घडणारे आजचे खेळाडू हेच उद्याचे देशाचे खरे प्रतिनिधी असतात. क्रीडा क्षेत्रातून आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि राष्ट्रीय बांधिलकीची घडण होते, असे प्रेरणादायी विचार माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. 

कोकमठाण येथे आयोजित ६९ व्या शालेय राष्ट्रीय १७ वर्षांखालील मुलींच्या कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कोकमठाण (ता.कोपरगाव) येथील आत्मा मलिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर तसेच विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट, कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विद्यार्थिनींनी पारंपरिक औक्षण करून मान्यवरांचे स्वागत केले. आयोजक संस्थांच्या वतीने त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मशाल फेरीद्वारे स्पर्धेची अधिकृत व जल्लोषात सुरुवात करण्यात आली.

डॉ. विखे पाटील म्हणाले की, खेळातून संघभावना, परस्पर सन्मान, पराभव स्वीकारण्याची मानसिकता आणि विजय संयमाने पचवण्याची शिकवण मिळते. राष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे हे प्रत्येक विद्यार्थिनीसाठी अभिमानाची बाब असून, या संधीचे सोने करून दाखवावे, असे आवाहन त्यांनी केले.


या ६९ व्या शालेय राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत देशातील २८ राज्ये व ८ केंद्रशासित प्रदेशांमधून तब्बल ५६० हून अधिक विद्यार्थिनींनी सहभाग नोंदवला आहे. विविध राज्यांतून आलेल्या संघांनी मान्यवरांना आपल्या राज्यांची ओळख करून दिल्याने या स्पर्धेत केवळ क्रीडात्मक नव्हे, तर राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सांस्कृतिक विविधतेचेही प्रभावी दर्शन घडत आहे.

पुढे डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले साईबाबांच्या पावन भूमीत आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत करताना, अशा राष्ट्रीय स्पर्धांमधून देशाला भविष्यातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू मिळतील, असा विश्वास व्यक्त केला. महाराष्ट्र राज्य क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील असून, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी शासन सदैव त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे मतही त्यांनी यावेळी मांडले.

या उद्घाटन सोहळ्यास एसीपी पंकज शिरसाठ (अर्जुन पुरस्कार विजेते), शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, संत अजिंक्य परमानंद महाराज, नंदकुमार जोशी, बाळासाहेब गोरडे, विठ्ठलराव होन यांच्यासह अनेक मान्यवर, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी, क्रीडा अधिकारी, प्रशिक्षक तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments