लोणी (प्रतिनिधी ज्ञानेश्वर साबळे) :प्रभू येशू ख्रिस्ताच्या जन्माचा पवित्र आनंद साजरा करणारा नाताळ सण राहुरी तालुक्यातील सात्रळ व सोनगाव परिसरात श्रद्धा, भक्ती आणि उत्साहात साजरा करण्यात आला. चर्चमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली असून संपूर्ण परिसर प्रार्थना, स्तुतिगीते व भक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.
या पवित्र सोहळ्याप्रसंगी सोनगाव धर्मगामाचे धर्मप्रमुख फादर रॉनी परेरा यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन करताना सांगितले की, भगवान येशू ख्रिस्तांनी मानवजातीला प्रेम, सत्य, दया, क्षमा, शांती व परोपकाराचा अमूल्य संदेश दिला. संपूर्ण जीवन मानवतेच्या कल्याणासाठी समर्पित करणाऱ्या प्रभू येशूंच्या विचारांचा अवलंब केल्यास समाजात एकता, बंधुता व सलोखा अधिक दृढ होईल, असे त्यांनी नमूद केले. ख्रिसमस सण सर्वांच्या जीवनात आनंद, सुख, समाधान, समृद्धी व उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.यानंतर फादर जस्टीन यांच्या हस्ते पवित्र नाताळ मिस्सा अर्पण करण्यात आली. यावेळी भाविकांनी प्रार्थना, स्तुतिगीते व भजने सादर करत प्रभूच्या जन्माचा आनंद साजरा केला. सेंट आण्णा हॉस्पिटलच्या सिस्टरांनी भाविकांना नाताळाच्या शुभेच्छा देत सणाचा उत्साह द्विगुणित केला.
या धार्मिक सोहळ्यास पॅरिस कौन्सिलचे सदस्य, महिला मंडळ, युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच सात्रळ, सोनगाव, चनेगाव, कोल्हार, तांभेरे, कानडगाव, रामपूर, हनुमंतगाव, पाथरे व कडीत मांडवे या परिसरातील भाविकांनी उपस्थित राहून नाताळ सण भक्तिभावाने साजरा केला.नाताळ सणानिमित्त संपूर्ण परिसरात आनंद, शांतता व सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र प्रेम, सद्भावना व एकतेचा संदेश पोहोचताना दिसून आला.सात्रळ–सोनगाव परिसरात नाताळचा भक्तीमय उत्सव ; चर्चमध्ये प्रार्थना, स्तुतिगीते; प्रेम, शांती व एकतेचा संदेशसात्रळ–सोनगाव परिसरात नाताळचा भक्तीमय उत्सव ; चर्चमध्ये प्रार्थना, स्तुतिगीते; प्रेम, शांती व एकतेचा संदेश
0 Comments