एकल महिलांचा विषय विधिमंडळाच्या पटलावरसाऊ समितीच्या प्रयत्नांना यश




टाकळीभान प्रतिनिधी - साऊ एकल महिला समितीच्या माध्यमातून ऐरणीवर आलेला महाराष्ट्रातील एकल महिलांचा प्रश्न मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या पटलावर चर्चेला आला.

साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी व राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांच्यासह समितीच्या राज्यभरातील समन्वयकांनी याविषयी विविध पातळीवर एकल महिलांच्या प्रश्नांवर आवाज उठविला होता. कोविड करोनाच्या महासंकटात मोठ्या प्रमाणात घरातील कर्त्या पुरूषाचे निधन होऊन महिलांना आपला आधारस्तंभ गमवावा लागला होता. त्यामुळे एकल महिलांची संख्या वाढून एकल महिला व त्यांच्या मुला मुलींचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या महिलांना मदतीचा हात देऊन त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने दि. २७ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयानुसार राज्यभरात तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय मिशन वात्सल्य शासकीय समन्वय समितींची स्थापना करण्यात आली. त्यात महिला व बालकांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय सदस्यांचाही समावेश आहे. या समितीच्या माध्यमातून विविध सरकारी विभागाच्या योजना व सेवांचा लाभ कोरोना एकल महिलांना मिळवून देणे अपेक्षित आहे. हे काम अपूर्ण असतानाच तालुकास्तरीय समित्यांचे कामकाज थंडावले आहे. कोरोना एकल महिलांप्रमाणेच राज्यभरात परित्यक्ता, विधवा, प्रौढ कुमारिका, घटस्फोटित अशा इतर एकल महिला देखील अनेक प्रश्न, अडचणींचा सामना करीत असल्याचे साऊ एकल महिला समितीच्या निदर्शनास आले. 
दि. २१ ऑगस्ट २०२१च्या शासन निर्णयानुसार गठीत मिशन वात्सल्य समितीची कार्यकक्षा करोना एकल महिलांपुरती सीमित होती. त्यामुळे समितीची व्याप्ती वाढवून सर्व प्रकारच्या एकल महिलांचा समितीच्या कार्यकक्षेत समावेश करण्याची मागणी साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती. त्यासाठी ३ वर्षांपासून पाठपुरावा सुरू होता. त्याची दखल घेत विधान परिषद सदस्य सर्वश्री सचिन अहिर, निरंजन डावखरे, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, उमा खापरे, सदाशिव खोत, डॉ. परिणय फुके, सुनील शिंदे यांनी राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान एकल महिलांबाबत विधान परिषदेत तारांकित प्रश्न विचारला  होता. 

त्यास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मंगळवारी लेखी उत्तर दिले. "मिशन वात्सल्य योजना महिला व बालविकास विभागाने कधीच बंद केली नव्हती. राज्यातील विविध सामाजिक संस्थांकडून सर्व प्रकारच्या एकल महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २९ सप्टेंबर २०२५च्या शासन निर्णयानुसार योजनेची व्याप्ती वाढवून सर्व प्रकारच्या एकल महिलांसाठी तालुकास्तरीय मिशन वात्सल्य शासकीय समितीचे कार्यक्षेत्र वाढविण्यात आले आहे. या समितीच्या माध्यमातून दि. २१ ऑगस्ट २०२१ च्या शासन निर्णयात नमूद विविध विभागांच्या २५ योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सहाय्य करण्यात येणार आहे.",असे मंत्री तटकरे यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे.
---------------------------------


राज्य सरकारने साऊ एकल महिला समितीच्या पाठपुराव्याची दखल घेऊन मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढविली आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्रातील सर्व प्रकारच्या एकल महिलांंना सरकारी योजनांचा लाभ व मदतीचा हात मिळणार आहे.
*--मिलिंदकुमार साळवे,* राज्य समन्वयक, साऊ एकल महिला समिती, सदस्य मिशन वात्सल्य शासकीय समिती.

Post a Comment

0 Comments