श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर, निमगाव यांच्यावतीने श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर अशा श्री साईबाबा पालखी सोहळ्याचे सहा ते 15 जानेवारी दरम्यान आयोजन--श्री श्री 1008 महामंडलेश्वर श्री काशिकानंद महाराज परमहंस

शिर्डी (प्रतिनिधी)-शिर्डी जवळील निमगाव येथील श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर यांच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त श्री साईबाबा भव्यरथ पालखी सोहळा श्री क्षेत्र शिर्डी ते श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर असा मंगळवार 6 जानेवारी 2026 ते गुरुवार 15 जानेवारी 2026 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर निमगाव शिर्डी चे महंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानंद महाराज यांच्यावतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

 या पत्रकात म्हटले आहे की ,श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस यांच्या शुभ प्रेरणेने व ह भ प विश्राम महाराज ढमाले यांच्या मार्गदर्शनाने श्री निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त भव्य स्वरूपात श्री साईबाबा पालखी पायी दिंडी सोहळा निघणार असून या दिंडीचे मंगळवार सहा जानेवारी 2026 रोजी सकाळी साडेआठ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था येथून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साईंच्या रथाचे व दिंडीच्या पालखीचे पूजन करून प्रस्थान होणार आहे. शिर्डी,जवळके, पांगरी, सिन्नर देवळाली कॅम्प, नाशिक , अंजनेरी, तळेगाव, असा मजल दरमजल पायी दिंडी प्रवास करत 13 जानेवारीला हा पायी दिंडी सोहळा, हरिपाठ आश्रम, त्र्यंबकेश्वर येथे पोहोचणार आहे. बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी त्रिंबकेश्वर येथे दर्शन तसेच गुरुवार दिनांक 15 जानेवारीला सकाळी सात ते नऊ या वेळेत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशिकानंदजी महाराज परमहंस यांचे काल्याचे किर्तन होणार आहे व त्यानंतर कै.ह भ प राधूबाबा मुरडनर यांच्या स्मरणार्थ संतोष अशोक मुरडनर व परिवार कोपरगाव यांच्याकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दिंडीचे हे 45 वे वर्ष आहे. या दिंडीमध्ये दररोज काकडा प्रवचन, कीर्तन, हरिपाठ आरती होणार असून सकाळ चहा नाश्ता, दुपार भोजन, सायंकाळी मुक्काम भोजन विविध अन्नदाते देणार आहेत. दिंडी त्रिंबकेश्वर येथील हरिपाठ आश्रम दत्त मंदिर ट्रस्ट येथे मुक्कामी असणार आहे. आजारी अतिवृद्ध व बालकांनी दिंडीत येऊ नये.

 तसेच या दिंडी सोहळ्यात जीवित वित्त हानी झाल्यास त्यास दिंडी चालक-मालक जबाबदार राहणार नाही तसेच भाविकांनी मौल्यावान वस्तू बरोबर आणू नये. या दिंडी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांनी दिंडीतील सर्व कार्यक्रमांना वेळेवर उपस्थित राहावे. असे पत्रकात सांगण्यात आले असून या श्री साईबाबा पालखी पायी दिंडी सोहळ्यामध्ये साईभक्त व भाविक वारकरी बंधू-भगिनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन श्री साईबाबा वारकरी शिक्षण संस्था, श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर आश्रम निमगाव शिर्डी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments