दिलीप शिंदे
सोयगाव दि.३० - राज्य परिवहन महामंडळाची एम.एच. १४ बीटी ३९०८ हि बस शेंदुर्णी ता जामनेर बस स्थानकावर आली असता जामनेर येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी बस मध्ये चढण्यासाठी गेले असता बसच्या चालकाने त्यांना मज्जाव करीत भडव्यानो बाजूला व्हा अशी शिवी दिली व बस घेऊन निघून गेला.त्यानंतर एम.एच. १४ बीटी २२४२ ही बस शेंदुर्णी बस स्थानकावर आली यावेळीही बसच्या वाहकाने विद्यार्थ्यांना बस मध्ये घेण्यास नकार दिल्याचा धक्कादायक प्रकार दि.३० बुधवारी नऊ ते साडे नऊ वाजेच्या सुमारास शेंदुर्णी बसस्थानकावर घडला.
याप्रकरणी संतप्त विद्यार्थ्यांनी जामनेर गाठत दोन्ही बस गाड्यांच्या वाहक व चालकाची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,मंत्री तथा जामनेर चे आमदार गिरीश महाजन,वाहतूक नियंत्रक जळगाव यांना जामनेर आगार प्रमुख यांच्या मार्फत लेखी तक्रार करण्यासाठी जात असताना एका एसटी कर्मचाऱ्याने त्यांना अडवित अर्वाच्य भाषेचा वापर करीत एसटी च्या भरवशावर तुम्ही शिक्षण घेत आहे. तुम्ही स्वतः ला काय समजता,तुम्ही अर्ज दिला तर सकाळची गाडी बंद करून टाकतो अशी धमकी दिल्याचा प्रकार जामनेर बसस्थानकावर घडला.संकट मोचक मंत्री तथा जामनेर चे आमदार गिरीश महाजन यांच्या जामनेरात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. एसटी च्या चालक,वाहक व संबंधित कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना अशी वागणूक देणे हे निषेधार्ह असून याप्रकरणी काय कारवाई केली जाते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, साहिल गुजर व त्याचे मित्र आद्योगिक प्रशिक्षण संस्था जामनेर येथे तांत्रिक शिक्षण (आयटीआय) घेत आहे.घरची परिस्थिती नाजूक असल्याने ते जामनेर येथे रूम भाडे व जेवणावळचा खर्च सोसू शकत नाही.त्यामुळे स्थानिक ठिकाणाहून जामनेर येथे शिक्षण घेण्यासाठी एसटी ने ये-जा करीत आहे. यासाठी परिवहन महामंडळाच्या नियमाप्रमाणे अँडव्हान्स पैसे भरून एसटी ची पास काढली आहे.आज दि.३० गुरुवारी सकाळी जामनेर जाण्यासाठी सकाळी नऊ ते साडे नऊ वजेच्या सुमारास शेंदुर्णी बस स्थानकावर उभे होतो.यावेळी एसटी क्रमांक एम.एच.१४ बीटी ३९०८ ही शेंदुर्णी बस स्थानकावर आली. आम्ही बस मध्ये चढण्यासाठी दरवाजा जवळ गेलो त्यावेळी बस वरील चालकाने आम्हाला बघताच फक्त प्रवाशांनी बसावे तुम्ही बाजूला व्हा भडव्यानो अशी शिवी दिली व आम्हाला बस मध्ये घेतले नाही.आमच्या परिस्थिती ची थट्टा करणाऱ्या या चालकावर तत्काळ कारवाई करण्यात यावी. त्यानंतर शेंदुर्णी बसस्थानकावर एम.एच. १४ बीटी. २२४२ ही बस आली. या बसच्या वाहकाने आम्हाला बस मध्ये घेण्यास मज्जाव केला. शिक्षणासाठी आम्ही अँडव्हान्स पास चे पैसे भरून देखील एसटी चे चालक व वाहक आम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत असून शिक्षण घेण्यासाठी जाण्यास आम्हाला उशीर होत आहे यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. संबंधित चालक व वाहक यांनी आम्हाला बस मध्ये का घेतले नाही याचे कारण द्यावे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,मंत्री तथा जामनेर चे आमदार संकट मोचक गिरीश महाजन ,वाहतूक नियंत्रक जळगाव यांना आगार प्रमुख जामनेर यांच्या मार्फत देण्यात येणाऱ्या लेखी तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. दरम्यान लेखी तक्रार देण्यासाठी जामनेर आगार प्रमुख यांच्याकडे जात असताना एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्यांना विचारणा करीत त्यांच्या जवळील अर्ज वाचला व उलट आम्हालाच म्हणाला तुम्ही इतके शहाणे झाले का, एसटी च्या भरवशावर तुमचं शिक्षण सुरू आहे. तुम्ही अर्ज दिला तर शेंदुर्णी येथून नऊ ते साडे नऊ वाजेच्या दरम्यान जामनेर जाणारी बस बंद करून टाकतो अशी धमकी दिल्याने विद्यार्थी घाबरले होते. जामनेर आगाराच्या अशा मुजोर वाहक,चालक व संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई केली जाणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. संकटनमोचकांच्या मतदार संघात हा प्रकार घडल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान जामनेर आगार प्रमुखांना दिलेल्या तक्रार अर्जावर साहिल गुजर,मयुर शिंदे,लोकेश माळी,समर्थ जोहरे, अक्षय चौधरी, रवि पाटील, ऋषिकेश गोंधळी,प्रथमेश सुतार,वैभव ढगे, निखिल पाटील व प्रशांत जोहरे या शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
प्रतिक्रिया -- विद्यार्थ्यांनी दिलेला तक्रार अर्ज प्राप्त झाला असून याप्रकरणाची चौकशी करून शहानिशा केल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.
दिनेश नाईक
आगार प्रमुख जामनेर जि. जळगाव
0 Comments