शिर्डी (राजकुमार गडकरी)-जो साईबाबांवर विश्वास ठेवून श्रद्धा आणि सबुरी बाळगतो त्याचं प्रत्येक काम साईबाबा पूर्ण करतात .साईबाबा आपल्या भक्तांना कधीच निराश करत नाहीत. असं सांगत साईबाबा मला मागण्या आधीच सगळं काही देतात. त्यामुळे मी साईबाबांचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिर्डीत येते व मनोभावे दर्शन घेते .असे मत प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. प्रसिद्ध सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने आपल्या बहीण शमिता शेट्टीसह नुकतेच शिर्डीत येऊन श्री साई मंदिरात जाऊन साईबाबांच्या समाधीचं मनोभावे दर्शन घेतले. यावेळी साई संस्थानचे जनसंपर्क अधिकारी दिपक लोखंडे आणि प्रशांत सूर्यवंशी यांनी शिल्पा शेट्टी यांचा शॉल आणि साईबाबांची मूर्ती देऊन सत्कार केला. साई दर्शनानंतर माध्यमांशी संवाद साधताना शिल्पा शेट्टी म्हणाल्या, "साईबाबांचे बोलवणं आलं की, मी लगेच शिर्डीला येते. साईबाबा माझी कायम आठवण ठेवतात आणि मला त्यांच्या दर्शनासाठी बोलावतात. हे माझं भाग्य आहे.
आज साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला खूप समाधान आणि आनंद वाटला." दरम्यान आपल्या आयुष्याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "सध्या कोणतीही अडचण नाही. हातपाय काम करत आहे, शरीर तंदुरुस्त आहे. अडचणींचा काळ तोच असतो, जेव्हा मन अस्वस्थ असतं. पण माझ्याबरोबर साईबाबा आहेत, त्यामुळं कुठलीच अडचण नाही. साईबाबांचा श्रद्धा आणि सबुरी हा महामंत्र प्रत्येक भक्तापर्यंत पोहोचला पाहिजे. असं शिल्पा शेट्टी यांनी म्हटलं आहे. शिल्पा शेट्टी शिर्डीत आल्याचे समजताच अनेक साईभक्त व चाहत्यांनी मंदिर परिसरामध्ये शिल्पा शेट्टी यांना पाहण्यासाठी गर्दी केली होती. अनेकांनी हात हलवून अभिवादन केले.
0 Comments