सोयगाव तहसील कार्यालयात अधिकारी,कर्मचारी नसताना देखील वीज उपकरणे सर्रास सुरू, जनतेच्या पैशांची उधळपट्टी,कारवाई करणार कोण?



दिलीप शिंदे
सोयगाव दि.२४ - तहसीलदार मनिषा मेने- जोगदंड यांचा कर्मचाऱ्यांवर अंकुश राहिलेला नसल्याने तहसील कार्यालयात दि.२४ शुक्रवारी एकही अधिकारी,कर्मचारी उपस्थित नव्हता.परंतु महसूल विभागातील विजेची उपकरणे सर्रास सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार साडे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड या अधिकारी,कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी, दि.२० ऑक्टोबर रोजी स्थानिक सुट्टी होती.तर दिवाळी असल्याने दि.२१,२२ व २३ भाऊबीज निमित्त सुट्टी होती. या आठवड्यात चार दिवस सुट्टीचा अधिकारी,कर्मचारी यांनी उपभोग घेतला. शुक्रवारी तहसील कार्यालय सुरू होते मात्र अधिकारी, कर्मचारी हे कार्यालयात गैरहजर असताना देखील महसूल विभागातील ट्यूब कांडी,पंखे ही वीज उपकरणे सर्रास सुरू होती.जनतेच्या पैशांवर मौजमजा करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनास्थेमुळे जनतेच्या पैशांची उधळपट्टी केली जात आहे. सोयगाव तहसील कार्यालयाचा अनागोंदी कारभार अनेक वेळा चव्हाट्यावर आला आहे.परंतु अद्यापही कारवाई झाली नसल्याने जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सोयगाव तहसील कार्यालयाच्या कारभाराकडे दुर्लक्ष करण्याचे कारण काय हे मात्र निरुत्तरित आहे. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी हे सोयगाव तहसील कार्यालयात शुक्रवारी गैरहजर असलेल्या अधिकारी,कर्मचारी यांची चौकशी करून त्यांचा एक दिवसाचा पगार कापणार का? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. दरम्यान दि.२० ऑक्टोबर रोजी स्थानिक सुट्टी असल्याचा आदेश दि.१४ जानेवारी २०२५ रोजी विभागीय आयुक्त सामान्य प्रशासन कार्यालयाने काढला होता. सोमवारी सुट्टी असल्याचे अधिकारी व कर्मचारी यांनाच माहिती होते. तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागात दि.२० ऑक्टोबर रोजी सुट्टी असल्याचे सूचना फलक लावण्यात आले नव्हते.त्यामुळे सर्वसामान्य नागरिक सोमवारी सुट्टी आहे या पासून अनभिज्ञ होते. आठवड्याचा पहिला दिवस,सोमवार असल्याने सावळदबारा (७० किमी) येथील वयोवृद्ध नागरिकांनी केवायसी करण्यासाठी तहसील कार्यालय गाठले होते. सुट्टी असल्याचे समजताच वयोवृद्धांचे डोळे पाणावले होते.सामाजिक कार्यकर्ते संदीप इंगळे यांनी संबंधितांशी संपर्क साधून वयोवृद्धांची केवायसी करण्यासाठी मदत केल्याचे वयोवृद्धानी प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

Post a Comment

0 Comments