सावळीविहीर बु. येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कर्मवीरांची जयंती उत्साहात साजरी!

राजकुमार गडकरी शिर्डी 
शिर्डी (प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्था ही फक्त आशिया खंडातील नाहीतर संपूर्ण जगातील मोठी शिक्षण संस्था असल्याचे गोरक्षनाथ बनकर यांनी आपल्या प्रमुख भाषणामध्ये सांगितले तर स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे म्हणत विद्यार्थ्यांना स्वावलंबी कसे व्हावे याचे धडे रयत शिक्षण संस्थेतून मिळत गेले असे मत उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी तोरणे साहेब यांनी यावेळी व्यक्त केले.  

                            शैक्षणिक क्षेत्रातील थोर समाजसुधारक व रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त न्यू इंग्लिश स्कूल, सावळविहीर बु. विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात सोमवार 22 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मोठ्या उत्साहात हे सर्व कार्यक्रम संपन्न झाले.
सकाळी विद्यालय प्रांगणात विद्यार्थ्यांनी सजवलेल्या कर्मवीरांच्या रथास गावचे माजी उपसरपंच तसेच स्थानिक स्कूल कमिटी सदस्य व माजी विद्यार्थी मा.श्री. गणेश  कापसे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक खेडकर सर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण गावातून ढोल ताशाच्या गजरात लेझीम-झांज पथकासह प्रभात फेरी व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची सजवलेल्या ट्रॅक्टर मधून मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शाळेच्या प्रांगणात परत आल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी मिष्टान्न भोजनाचा आस्वाद घेतला. कोपरगाव येथील प्रसिद्ध उद्योजक मा. राजेंद्रजी कापसे पाटील (कार्यकारी संचालक, श्री साई पॉवर कन्ट्रोल प्रा.लि. कोपरगाव) यांच्यातर्फे विद्यालयास दीड लाख रुपये किमतीचे आर ओ फिल्टर प्लांट बसविण्यात आले सदर प्लांटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व सदस्य पदाधिकारी उपस्थित होते. नंतर प्रत्यक्ष कार्यक्रमाची सुरवात स्वागत गीताने करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षक श्री.खेडकर सर यांनी केले. कार्यक्रमाचे अध्यक्षीय स्थान (स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष) मा. श्री. बाळासाहेब जनार्दन जपे पाटील यांनी भूषविले. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी मा. श्री. तोरणे साहेब व उद्योजक मा. श्री. भाऊसाहेब चौधरी साहेब उपस्थित होते. प्रमुख वक्ते मा.प्रा.श्री. गोरक्षनाथ बनकर (माजी व्हा. चेअरमन, रयत बैंक, अध्यक्ष-स्नेह ग्रुप, श्रीरामपूर) हे लाभले. अध्यक्ष निवड झाल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई वहिनी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तसेच शाखेचा इतिहास विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ डहाळे मॅडम यांनी सांगितला. प्रथमतः इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु. जमधडे अवंतिका नितीन, कु.नेहा राजू वाघमारे कु.भक्ती रमेश तुरकणे या विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट शैलीत कर्मवीरंबाबत आपले विचार व्यक्त केले. सदर वक्तृत्वासाठी त्यांना स्कूल कमिटीचे अध्यक्ष  श्री. बाळासाहेब जपे पाटील व उद्योजक मा.श्री.भाऊसाहेब चौधरी पाटील यांच्यातर्फे पाचशे रुपये रोख रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आले. सर्व मान्यवरांचा सन्मान शाल व श्रीफळ देऊन करण्यात आला. विद्यालयात पार पडलेल्या निबंध, चित्रकला, वक्तृत्व, रांगोळी, क्रीडा यामध्ये प्राविण्य प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान रायटिंग बोर्ड, पेन‌ व स्केच पेन, प्रशस्तीपत्रक देऊन करण्यात आला. कर्मवीरांच्या जीवनावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी  श्री तोरणे साहेब यांनी दिला. कमवा आणि शिका तसेच स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद असे म्हणत विद्यार्थ्यांना स्वावलंबी कसे व्हावे याचे धडे दिले. पत्रकार   अमोल वाघमारे  यांनी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा  दिला. ते म्हणाले मी जरी रयत चा विद्यार्थी नसलो तरी कर्मवीर अण्णांची जयंती जेव्हा असायची तेव्हा मी रयत शाळेत येऊन त्यांची जयंती साजरी करायचो. कार्यक्रमास लाभलेले प्रमुख व्यक्ती माननीय श्री. गोरक्षनाथ बनकर यांनी रयतेचा वटवृक्ष कानाकोपऱ्यात पसरलेला आहे रयत ही फक्त ही आशिया खंडातील मोठी शिक्षण संस्था नसून संपूर्ण जगातील मोठी संस्था आहे असे सांगितले आज रयतेचा विद्यार्थी जगाच्या कानाकोपऱ्यात कर्मवीरांचे गीत गातो. असे मत मांडले. त्यांनी आपल्या भाषणात कर्मवीरांचे बालपण ते अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवास उलगडून सांगितला. विद्यालयाचा माजी विद्यार्थी चि.अविनाश भाऊसाहेब  निकम यांची जपान येथील नामांकित ओपन अप  कंपनी ठिकाणी निवड झालेली असून त्यांचा सत्कार उत्तर विभागीय सहाय्यक अधिकारी  श्री. तोरणे साहेब यांनी केला. विशेष आकर्षण ठरले ते संगणक तज्ञ व एआय विभाग प्रमुख श्री. वाकचौरे सर यांचे सादरीकरण. त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने “कर्मवीर अण्णांचे विद्यालयात प्रत्यक्ष आगमन” जणू साकार केले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्व मान्यवरांनी कौतुक करून या कार्यासाठी रयत शिक्षण संस्था उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी श्री. तोरणे साहेब व उद्योजक श्री. भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवटी अध्यक्ष भाषण स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मा.श्री. बाळासाहेब जनार्दन पाटील जपे यांनी विद्यार्थ्यांना घडायचे असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे सांगत शिक्षणाचे महत्त्व त्यांनी व्यक्त केले.व त्यांनी असे जाहीर केले की उद्योजक  श्री.भाऊसाहेब चौधरी साहेब यांच्यातर्फे विद्यालयास तीन ते पाच लक्ष रुपये देणगी देणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे शेवटी आभार प्रदर्शन विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती कानडे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री.तुपे सर व रयत बँकेचे व्हा. चेअरमन श्री.डहाळे साहेब उपस्थित होते. तसेच गावातील प्रतिष्ठित माजी विद्यार्थी, सर्व ग्रामस्थ, तसेच शिक्षणप्रेमी नागरिक उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील मुख्याध्यापिका सौ.डहाळे मॅडम, ज्येष्ठ शिक्षक श्री. म्हस्के सर, श्री.काळेगोरे सर, श्री.खान सर, श्रीमती.कानडे मॅडम, श्री.खेडकर सर, श्री.धिवर सर, श्री.वाकचौरे सर व सर्व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आपली जबाबदारी पार पाडली.

Post a Comment

0 Comments