सावळीविहीर येथील प्रसिद्ध व पुरातन अशा श्री देवी लक्ष्मी मातेच्या नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात!

शिर्डी( प्रतिनिधी) सावळीविहीर व पंचक्रोशीतील प्रसिद्ध व पुरातन अशा श्री लक्ष्मी देवी मातेच्या मंदिरामध्ये नवरात्र उत्सवाला मोठ्या भक्ती भावात आणि उत्साहात सुरुवात झाली असून शारदिय नवरात्री निमित्त पहिल्या माळेपासूनच भाविकांची दर्शनासाठी  येथे मोठी गर्दी होवू लागली आहे. राहाता तालुक्यातील शिर्डी नजीक असणाऱ्या सावळीविहीर बुद्रुक येथील गोदावरी उजवा कालव्याच्या तीरावर भव्य असे प्रसिद्ध व पुरातन श्री देवी लक्ष्मी मातेचे पूर्वमुखी मंदिर असून ही देवी नवसाला पावणारी देवी म्हणून भाविकांची श्रद्धा आहे. 
भव्य मंदिर असून या मंदिरातील गाभाऱ्यामध्ये श्री देवी लक्ष्मी मातेची सुमारे तीन साडेतीन फुटाची पूर्वमुखी तसेच शेजारीच चतुर्भुज अशी श्री कालिका मातेची भव्य उभी उंच मूर्ती असून अतिशय सुंदर व आकर्षक अशा मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेतल्याशिवाय राहत नाही. नवरात्री मध्ये येथे नऊ दिवस मोठी यात्रा भरत असून पहिल्यामाळे पासूनच येथे भाविकांची गर्दी दर्शनासाठी वाढली आहे.
अनेक जण येथे नवस करतात किंवा नवस पावल्यानंतर नवस फेडण्यासाठी येथे येतात. श्री सप्तशृंगी गडावरून मशाल ज्योत येथील तरुणांनी आणली आहे. नवरात्र निमित्त मंदिर व परिसरात मंडप व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. उंच दीपमाळेवर व रस्त्याच्या बाजूने आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली असून स्वागत कमानी उभारण्यात आले आहेत. हार फुल प्रसाद मिठाईचे दुकाने थाटली आहेत तसेच अजूनही काही दुकाने येत आहेत. दीपमाळे शेजारी अनेक भाविकांनी मातीच्या घटांची मोठ्या भक्ती भावाने दरवर्षाप्रमाणे यावर्षीही येथे घटस्थापना केली आहे.सावळी विहीर व  परिसरातील भाविक सकाळी व संध्याकाळी आरती साठी मोठ्या संख्येने पायी येतात. आरती करून दर्शन घेतात .प्रसादाचाही लाभ घेतात. येथे मंदिरामध्ये अनेक महिला या दरवर्षीप्रमाणे येथे नऊ दिवस उपवास करत घटी बसतात. यावर्षीही बसल्या आहेत.सातव्या माळेला येथे मोठी यात्रा भरते. येथील जय भवानी तरुण मंडळ, ट्रस्ट तसेच सावळीविहीर ग्रामस्थ हा  नवरात्र उत्सव व विविध धार्मिक कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी परिश्रम घेत आहेत.(प्रतिनिधी राजकुमार गडकरी शिर्डी)

Post a Comment

0 Comments