स्वस्थ नारी सशक्त परिवार- ग्रामीण रुग्णालयात आयोजित शिबिराकडे डॉक्टरांनी फिरवली पाठ, महिलांकडून संताप व्यक्त, डॉक्टरांवर कारवाईची मागणी

  

दिलीप शिंदे 
सोयगाव दि.३०- सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर हा सेवा पंधरवाडा राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला होता.या सेवा पंधरवाड्याचे औचित्य साधून  स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी दि.३० मंगळवारी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.  जिल्हा पातळीवरील डॉक्टरांनी या शिबीराकडे पाठ फिरवल्याने महिलांनी संताप व्यक्त केला होता. संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या पद्मा शिंदे यांनी केली आहे.
     याबाबत सविस्तर माहिती अशी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर , राष्ट्राच्या आरोग्य दृष्टिकोनात बदल घडविण्यासाठी,संपूर्ण देशभर महिला आरोग्य तपासणी,उपचार सेवा आणि पोषण यावर विशेष भर या उपक्रमात स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानांतर्गत दि.३० मंगळवारी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे महिलांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा पातळीवरील 
डॉ.मीनाक्षी अंधाळकर (गायनेकोलॉजिस्ट), डॉ.रुपेश माथे (पेडियाट्रिसियन), डॉ.गिरीधर बोंडले (आय स्पेशालिस्ट), डॉ.अमोल कुकडे (फिजिशियन), डॉ. अजिंक्य इंगोले (ऑर्थोपेडिशन), डॉ.मुंडे (डर्माटोलॉजिस्ट), डॉ. जगदीश टेकळे (पायकिआट्रिस्ट), डॉ.नितीन निकाळे (सर्जन), डॉ. मारावार (अनेथेशिया), डॉ. पुष्कर दहिवाल (डेंटल सर्जन) या तज्ञ डॉक्टरांचे पथकाकडून ग्रामीण भागातील महिलांची आरोग्य तपासणी करण्यात येणार होती. मात्र या डॉक्टरांनी वरिष्ठांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित शिबिराकडे पाठ फिरवल्याने आरोग्याची तपासणी करण्यासाठी आलेल्या महिलांनी संताप व्यक्त केला होता. शिबिरात आरोग्य तपासणी साठी आलेल्या महिलांची  ग्रामीण रुग्णालयाचे कर्तव्यदक्ष अधीक्षक डॉ.दिनाजी खंदारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोग्य तपासणी केली. संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या पद्मा शिंदे यांनी केली आहे.

चौकट:- राज्यात भाजप चे सरकार असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा हाच संकल्प पंधरवाडा घोषित करण्यात आला होता याचे औचित्य साधत ग्रामीण रुग्णालयात महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. मात्र तज्ञ डॉक्टरांनी या शिबीराकडे पाठ फिरवली. हा ग्रामीण भागातील महिलांचा एक प्रकारे अपमान आहे. महिलांच्या सन्मानाची भाषा करणारे मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, आमदार या डॉक्टरांवर कारवाई करणार का असा प्रश्न महिलांकडून उपस्थित केला जात आहे.

प्रतिक्रिया:- महिलांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून तज्ञ डॉक्टरांकडून महिलांची आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात होते. या शिबिराला गैरहजर राहून डॉक्टरांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा अपमान केला असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
                                       पद्मा शिंदे
                               सामाजिक कार्यकर्त्या सोयगाव

Post a Comment

0 Comments