दिलीप शिंदे
सायगाव दि.३०- पहूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी विजय जाधव याने रात्री ठाण्यात बोलावून त्याच्या खाजगी इसमांच्या ताब्यात दिले.त्या इसमांनी खिशातील तीस हजार रुपये काढून घेत पुन्हा पहूर (ता. जामनेर जि.जळगाव ) पोलिस ठाण्यात आणले. विजय जाधव याने मारहाण करून मोटार सायकल ची चाबी घेऊन मोटार सायकल हिसकावून घेतल्याचा धक्कादायक प्रकार पहूर पोलिस ठाण्यात घडला असून या प्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी यासाठी दि.२६ सप्टेंबर रोजी युवकाने उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग (जि जळगाव) कार्यालय गाठले होते.
उशीर झाल्याने तक्रार अर्ज स्वीकारण्यात आला नाही त्यामुळे युवकाने पाचोरा येथेच रात्र काढली व दि.२७ सप्टेंबर रोजी उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग जि.जळगाव यांच्याकडे लेखी तक्रार अर्ज दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, नवल हरचंद चव्हाण वय २५ वर्षे रा.वरखेडी बुद्रुक ता.सोयगाव जि.छत्रपती संभाजीनगर असे पहूर (ता. जामनेर जि. जळगाव) पोलिस ठाण्यात पोलिसाकडून मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.दरम्यान दि.२५ सप्टेंबर रोजी दुपारी ०४:४२ वाजता मो. ९३५९१७५९४४ या क्रमांकावरून फोन करून पोलीस कर्मचारी विजय जाधव यांनी पहूर ( ता.जामनेर जि जळगाव) पोलिस ठाण्यात बोलावले.मी माझ्या मालकीची एम एच २० एच डी ७५४० या मोटार सायकलने रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास पहूर पोलीस ठाण्यात गेलो असता मी विजय जाधव यांना विचारले मला का ठाण्यात बोलावले,मी काय केले,माझी चूक काय, अशी विचारणा करताच मला विजय जाधव या कर्मचाऱ्यांनी अर्वाच्च व अश्लील भाषेचा वापर करीत तू जास्त बोलू नको तुला कुठही गुंतवून टाकेन मस्ती आला का असे धमकावले.व मला दमदाटी करीत रात्री साडे नऊ ते दहा वाजेच्या सुमारास त्यांचे खाजगी सहकारी भाऊल उत्तम चव्हाण रा. लिहातांडा ता.जामनेर, गजानन काशिनाथ जाधव रा.वरखेडी बुद्रुक ता. सोयगाव यांच्यासह इतर चार अशा एकूण सहा जणांच्या ताब्यात दिले.या सहा जणांनी चार चाकी वाहनातून अज्ञात ठिकाणी फिरवले.गाडीत मारहाण करीत माझ्या खिशात असलेले तीस हजार रुपये (३००००/₹) काढून घेतले. व दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री सव्वा बारा ते एक वाजेच्या दरम्यान ठाण्यात आणले याच दरम्यान पोलीस कर्मचारी विजय जाधव याने मला मारहाण केली. व तू इथून निघ असे म्हटले त्यावेळी मी त्यांना मोटार सायकल मागितली तर त्याने मला तीस हजार रुपयांची (३००००/₹) मागणी केली. तीस हजार रुपये घेऊन ये व तुझी गाडी घेऊन जा, खाली हात जर आला तर गाठ माझ्याशी आहे असे धमकावत पुन्हा शिवीगाळ केली.तू जर माझ्या व माझ्या साथीदार यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार करण्यास गेला तर तुझा सुपडा साफ करून टाकेल अशी धमकी दिली. तसेच वरील खाजगी सहकाऱ्यांच्या मदतीने रात्री दोन वाजेच्या सुमारास वरखेडी बुद्रुक गावाजवळ आणून सोडले. माझ्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध विजय जाधव व त्यांचे खाजगी सहकारी यांच्यावर मारहाण करणे,खिशातील रक्कम काढणे व जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात यावा असे उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा विभाग जि.जळगाव यांना २७ सप्टेंबर रोजी दिलेल्या लेखी तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून उप विभागीय पोलीस अधिकारी पाचोरा व जळगाव जिल्ह्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक या प्रकरणी संबंधितांवर काय कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments