रामराव आदिक पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये परीक्षा पोर्टल अॅपचा उत्साहपूर्ण शुभारंभ



टाकळीभान प्रतिनिधी- रामराव आदिक पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये "परीक्षा पोर्टल अॅपः अभ्यास, सराव व यश" या डिजिटल उपक्रमाचा शुभारंभ प्राचार्य श्री. प्रसाद मुंडलिक, शैक्षणिक समन्वयक श्री. अविनाश वाघ, फौंडेशन समन्वयक श्रीमती प्रतिभा आढाव तसेच सर्व शिक्षकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आला. इयत्ता ५ वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या संगणक लॅब मध्ये परीक्षा पोर्टल अॅपच्या मदतीने स्पर्धा परीक्षेचे प्रश्न सोडवले.
रामराव आदिक पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये परीक्षा पोर्टल अॅपचा उत्साहपूर्ण शुभारंभ
        परीक्षा पोर्टल अॅप हे विद्यार्थ्यांसाठी खास तयार केलेले आधुनिक डिजिटल व्यासपीठ असून याच्या माध्यमातून विद्यार्थी शालेय अभ्यासक्रमासोबत विविध स्पर्धा परीक्षांची तयारी प्रभावीपणे करू शकतात. आपल्या देशामध्ये इयत्ता १ ली ते १२ वीपर्यंत विविध माध्यमांच्या सुमारे १५० हून अधिक स्पर्धा परीक्षा आयोजित केल्या जातात. प्रत्येक इयत्तेनुसार १० ते २० विविध परीक्षा असल्याने सर्व परीक्षांची तयारी प्रत्यक्ष शाळेत घेणे प्रॅक्टिकली शक्य नसते. या समस्येवर समाधानकारक तोडगा म्हणून स्केलझेन टेक्नॉलॉजीज प्रा. लि. चे संचालक श्री. मयूर ढोकचोळे सर यांनी परीक्षा पोर्टल अॅप विकसित केले आहे.

या अॅपमध्ये इयत्ता १ ली पासून १२ वीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी वर्गनिहाय व परीक्षानिहाय लाईव्ह व रेकॉर्डेड लेक्चर्स, विद्यार्थी नोट्स, अध्ययनसामग्री व सराव प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मोबाईल व संगणक या दोन्ही माध्यमांतून विद्यार्थी या अॅपचा वापर करू शकतात. त्यामुळे वेळेची बचत, अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन व सातत्यपूर्ण तयारी शक्य होते. शाळा देखील विद्यार्थ्यांकडून दैनंदिन परीक्षेची तयारी करून घेऊ शकते, तसेच विद्यार्थी स्वतःच्या पातळीवरही अभ्यास मजबूत करू शकतात.
     संस्थेचे कार्यकारी विश्वस्त अविनाश आदिक साहेब यांनी नेहमीच शैक्षणिक प्रगतीसाठी विविध नवनवीन उपक्रम राबवले आहेत. यामध्ये सुपर फाउंडेशन वर्ग, स्पर्धा परीक्षा वर्ग आणि आता परीक्षा पोर्टल अॅपचा समावेश झाला आहे. या अभिनव उपक्रमाचे कार्यकारी विश्वस्त अविनाश आदिक व विश्वस्त अनुराधाताई आदिक यांनी स्वागत करून सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात उज्ज्वल यशस्वीतेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments