टाकळीभान प्रतिनिधी -
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या टेम्पो चोरीच्या गुन्ह्याच्या तपासासाठी कमालपूर येथे गेलेल्या गुन्हे शोध पथकावर सदर गुन्ह्यातील संशयित आरोपीने थेट ट्रॅक्टर घालून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांच्या पथकावर जीवघेणा हल्ला केल्याची ही धक्कादायक घटना कमलपूर येथील ‘चक्रधर दूध डेअरी’समोर बुधवारी (ता.२५) सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली.या घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून पथकातील पोलिसांसह आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे.
दरम्यान या हल्ल्यात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रसाद साळवे (पो.हे.कों/१५८१) यांच्या उजव्या हातावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने ते रक्तबंबाळ होऊन गंभीर जखमी झाले आहेत. तर त्यांच्या मदतीस धावलेले बाबा इमाम सय्यद (रा. टाकळीभान/टाकळीभान परिसर, ता. श्रीरामपूर) यांनाही या हल्ल्यात जबर धक्का बसून डोके व पायाला गंभीर दुखापत झाली. दोघांनाही पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे हलविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, टाटा ७०९ टेम्पो (एमएच १४ एएच ०३६९) च्या चोरी प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.रं.नं ११०३/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३०५ (बी) अन्वये गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यातील मुद्देमाल लक्ष्मीकांत काळू मुंजाळ (रा. कमलपूर, ता. श्रीरामपूर) याच्याकडे असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी गुन्हे शोध पथकातील पो.नि. रोशन निकम, पो.उप.नि. रोशन निकम आणि पथकातील अंमलदार अजित अशोक पटारे (पोकों/१०८६, वय ३४, श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे), प्रसाद साळवे आदींना तपास करण्यासाठी रवाना केले. पोलिसांच्या पथकाने कमालपूर येथे सापळा रचला.
आरोपी हा दूध डेअरीवर ट्रॅक्टर (निळ्या रंगाचा) घेऊन येताच पोलिसांनी त्यास थांबवून तुझ्याकडे कायदेशीर चौकशी करायची असल्याने ट्रॅक्टरवरून खाली उतरण्यास सांगितले. मात्र,आरोपीने ट्रॅक्टर सुरू करून भरधाव वेगात पळून जाण्याचा प्रयत्न केला. “मला अडवलं तर तुमचा ट्रॅक्टरखाली मुडदा पाडीन” अशी दहशत माजवत त्याने ट्रॅक्टर थेट पोलिसांच्या अंगावर घातला. ट्रॅक्टरच्या धडकेत साळवे खाली कोसळले आणि ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या हातावरून गेले. याचवेळी, मदतीला आलेले बाबा इमाम यांनाही ट्रॅक्टरचा जोरदार धक्का बसून ते बराचवेळ बेशुद्ध पडले.
या गोंधळात हवालदार अजित पटारे यांनी प्रसंगावधान राखत चालत्या ट्रॅक्टरवर चढून ब्रेकवर पाय ठेवून ट्रॅक्टर थांबविला आणि आरोपीला झटापटीत ताब्यात घेतले. या थरारक दृश्याचे प्रत्यक्ष साक्षीदार कमलपूरमधील ग्रामस्थ ठरले.जमावाने संपूर्ण घटना पाहिल्याने आरोपीची दहशत व पोलिसांची शौर्यपूर्ण कारवाई उघड झाली.
घटनास्थळावर पो.नि.निकम आणि पथक पोहोचल्यानंतर आरोपीला ट्रॅक्टर–ट्रॉली आणि त्यातील वाळूसह पोलीस ठाण्यात आणण्यात आले.जखमी पोलिसांना कदम हॉस्पिटल व नागरिकाला अनारसे हॉस्पिटल येथे प्राथमिक उपचार देऊन पुढील उपचारासाठी अहिल्यानगर येथे पाठविण्यात आले आहे.
0 Comments