टाकळीभान प्रतिनिधी-"तुमचा जोडीदार गमावल्यामुळे आता तुम्हीच तुमच्या मुला-मुलींचे आई वडील आहात. मात्र या पुढील प्रवासात आम्ही तुमच्या सोबत आहोत. त्यासाठी तुम्हीही पुढे आले पाहिजे. तरच सर्व एकल महिला एकमेकांच्या साथीने पुढे जाऊ शकतील", अशा शब्दात साऊ एकल महिला समितीच्या अध्यक्ष प्रतिमा कुलकर्णी यांनी एकल महिलांना आश्वस्त केले.
निमित्त होतं श्रीरामपूर येथील गंगाधर ओगले साखर कामगार रूग्णालयात आयोजित एकल महिलांच्या आरोग्य तपासणी शिबिराचं. राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स, जगदंब फाऊंडेशन, साखर कामगार रूग्णालय, सेवा नर्सिंग कॉलेज, साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने या मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी कुलकर्णी अध्यक्ष पदावरून बोलत होत्या. रयत शिक्षण संस्थेच्या पदाधिकारी मीनाताई जगधने, उद्योजक किशोर निर्मळ, कामगार रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. रवींद्र जगधने, दिनेश चोरडिया, भाजप महिला मोर्चाच्या सुप्रिया धुमाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून आरोग्य सेवा करणारे वडाळा महादेवचे राहूल राऊत व राज्य सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल आरोग्यमित्र सुभाष गायकवाड, गिरीश गांधी पुरस्काराबद्दल साऊ एकल महिला समितीचे संस्थापक निमंत्रक हेरंब कुलकर्णी, मुंबईचा आचार्य अत्रे कट्टा पुरस्काराबदल प्रतिमा कुलकर्णी यांना यावेळी गौरविण्यात आले. हेरंब कुलकर्णींचा सत्कार प्रतिमा कुलकर्णी यांनी स्वीकारला. आरोग्य तपासणी नंतर सहभागी महिलांना विविध कडधान्यांचे संच देण्यात आले. समितीचे राज्य समन्वयक मिलिंदकुमार साळवे यांनी प्रास्ताविक केले.
यावेळी कुलकर्णी म्हणाल्या, "समाजाची जाणीव, नेणीव असलेले कार्यरत साऊ एकल महिला समितीमध्ये आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळेच राज्यात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या लाभार्थींची संख्या वाढली. या योजनेच्या निधीसाठी मिलिंदकुमार साळवे मंत्रालयापर्यंत सतत पाठपुरावा करीत असतात. असे कार्यकर्ते व समिती एकल महिलांसोबत आहे. आम्ही एक पाऊल टाकले, तर तुम्ही देखील दोन पावले पुढे टाकली पाहिजेत. एकल महिलांनी राजमाता अहिल्यादेवींप्रमाणे वेळप्रसंगी मुलांबाबत कठोर बनून त्यांना शिस्त लावून त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत.,"
जगधने, निर्मळ, गायकवाड यांनीही शिबिराला शुभेच्छा दिल्या.
0 Comments