शिर्डी( प्रतिनिधी) शिर्डी येथील
साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडीट को-ऑप. सोसायटी ही संस्था संचालक मंडळाने सभासदांच्या हितासाठी घेतलेल्या भरीव निर्णयांमुळे प्रगतीपथावर वेगाने वाटचाल करत असून प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आणि विरोधकांना त्यातूनच चोख प्रत्युत्तर मिळाले आहे. असे या संस्थेचे चेअरमन विठ्ठलराव पवार यांनी म्हटले आहे.
कायम कर्मचारी व नाममात्र सभासदांसाठी स्थापन झालेली ही सोसायटी आज सभासदांच्या जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवत आहे. सभासदांना ७ लाख रुपयांपर्यंत फक्त ८ टक्के व्याजदराने कर्ज, क्लिन कॅश क्रेडीट ११ टक्के व्याजदराने, गृहदुरुस्ती कर्ज १३ टक्के दराने तसेच सेवक कर्जावर ८ टक्के दराने आर्थिक मदत दिली जात आहे. आतापर्यंत सभासदांना तब्बल ७२ कोटी रुपयांहून अधिक कर्जपुरवठा करण्यात आल्याने सोसायटीवर विश्वास वाढला आहे. याशिवाय मुला मुलींच्या लग्नासाठी ११ हजार रुपये विनापरतीचे अनुदान, कुटुंबातील सदस्याच्या निधनानंतर तेवढ्याच रकमेत प्रासंगिक मदत, मुलांच्या शैक्षणिक प्रोत्साहनासाठी शालेय साहित्य, सभासद व कर्मचाऱ्यांसाठी दरवर्षी १० लाखांचा नैसर्गिक मृत्यू विमा यासारख्या योजना राबवल्या जात आहेत. दिवाळी, संक्रांत व गुढीपाडवा निमित्त सभासदांना दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमुळे सोसायटीने कुटुंबवत्सल संस्थेचा दर्जा मिळवला आहे.
फक्त सभासदांपुरतीच नाही तर साईभक्तांसाठीही सोसायटीने पुढाकार घेतला आहे. संस्थान परिसरात प्रसाद व नॉव्हेल्टी स्टोअर, जनरल स्टोअर, दुग्धजन्य पदार्थ व थंडपेय विक्री स्टॉल तसेच मोफत पादत्राणे गृह व बॅग क्लोकरूम यांसारख्या सुविधा देऊन सेवा हाच धर्म ही संकल्पना साकारली आहे. साई तीर्थ किंवा ट्रेडमार्कसह विक्रीस ठेवलेला प्रसाद, पेढा आणि बाटलीबंद पाणी भक्तांचा विश्वास संपादन करत आहे.
0 Comments