आज सर्वत्र होत आहे मोठ्या उत्साहात साजरा! श्री महादेवाच्या मंदिरामध्ये पूजेसाठी महिलां भाविकांची गर्दी

शिर्डी (प्रतिनिधी) हरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. 'हरिता' म्हणजे 'जिला नेले ती' आणि 'लिका' म्हणजे 'सखी'. पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात. मंगळवार दिनांक 26 ऑगस्ट 2025 रोजी यावर्षी हरीतालिका  असून हा सण व हरितालिका चे व्रत महिलांमधून मोठ्या भक्ती भावाने साजरा केले जात आहे. हरितालिकाची मोठी आख्यायिका आहे.
पूर्वकाली पर्वतराजाची कन्यापार्वती ही उपवर झाली व नारदाच्या सल्ल्याने तिच्या पित्याने तिचा विवाह विष्णूशी करण्याचा बेत केला. परंतु पार्वतीच्या मनात शंकराला वरण्याचे असलाने तिने आपल्या सखीकडून पित्यास निरोप पाठविला की, ‘तुम्ही मला विष्णूच्या पदरी बांधल्यास मी प्राणत्याग करीन’. आपल्या सखीच्या मदतीने ती घरातून निघून गेली व शिवाचा लाभ व्हावा म्हणून एका अरण्यात जाऊन तिने शिवलिंगाची पूजा केली .पार्वतीने शिवलिंगाची पूजा केली आणि दिवसभर कडकडीत उपवास करून जागरण केले.तिच्या तपाने शिव प्रसन्न झाले आणि त्यांनी पार्वतीच्या विनंतीला मान देऊन पत्नी म्हणून तिचा स्वीकार केला अशी आख्यायिका आहे.
शिवपार्वती किंवा उमा महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात.स्त्रीतत्त्व आणि पुरुष तत्त्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्त्वांचे पूजन करतो.आदिशक्तीच्या पूजनातून तेचे प्रकटन आपल्यात व्हावे म्हणून प्रार्थना केली जाते.
या दिवशी वाळूचे शिवलिंग करून त्याची पूजा करतात किंवा सखी आणि पार्वती यांची शिवलिंगासहित मूर्ती आणून त्यांचीही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे. या दिवशी संकल्प,सोळा उपचार पूजन,सौभाग्यलेणी अर्पण, नैवेद्य,आरती व कथावाचन असे या पूजेचे सामान्यत: स्वरूप असते.हरितालिका हे व्रत भारतभरात केले जाते. पार्वतीसारखाच आपल्यालाही चांगला नवरा मिळावा म्हणून दक्षिण भारतात अनेक  कुमारिका हे व्रत करतात. हे व्रत भाद्रपद शुद्ध तृतीयेला केले जाते. या दिवशी उपास करून गौरी आणि तिची सखी यांच्या मातीच्या मूर्तींची पूजा केली जाते. गुजराथमध्ये किंवा बंगालमध्ये हरितालिका नसते. तमिळनाडूमध्ये माघ शुद्ध द्वितीयेपासून तीन दिवस गौरी उत्सव चालतो. तेथे कुमारिका आभि सौभाग्यवती स्त्रियाही हे व्रत करतात.तर महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहित स्त्रियां आणि विधवा स्त्रियांही हे व्रत करतात. मोठ्या भक्ती भावाने हे व्रत केले जाते. शिव शंकराची पूजा केली जाते. आज मंगळवारी  हारतिलका असून सर्वत्र ती साजरी होत आहे. शिव शंकराच्या मंदिरांमध्ये महिला भाविकांची मोठी गर्दी पूजेसाठी दिसून येत आहे.

Post a Comment

0 Comments