दिलीप शिंदे
सोयगाव दि.२९- सोयगाव तालुक्यातील बंद स्थितीत असलेल्या २३ आरोग्य उपकेंद्र सुरू न करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करून सेवेतून निलंबित करण्याची मागणी मराठा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हांडे यांनी दि. ०९ जानेवारी २०२४ रोजी आरोग्य सेवा आयुक्तालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली होती.
जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. सरिता हजारे यांनी दि. २१ एप्रिल २०२५ रोजी स्मरण पत्राद्वारे चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. हजारे यांच्या आदेशाला जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांनी केराची टोपली दाखवली आहे. चार महिन्यांचा कालावधी लोटला असून देखील चौकशी गुलदस्त्यात असल्याने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांविषयी तालुका वासियांमधून संताप व्यक्त केला जात आहे. २३ उपकेंद्रांच्या बांधकामांची सद्यस्थिती ,२३ उपकेंद्रांना पदनिर्मिती झाली आहे काय?, पदनिर्मिती झाली असल्यास पदांबाबतची सद्यस्थिती, रिक्त पदे असल्यास त्याची कारणे नमूद करावीत,२३ उपकेंद्रांमध्ये सर्व साहित्य सामुग्री उपलब्ध आहे काय?,सर्व उपकेंद्राच्या वापरा बाबत माहिती, सर्व उपकेंद्रांचे कर्मचारी मुख्यालयी निवासस्थान माहिती, या मुद्यांबाबत चौकशी करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांना आरोग्य सेवा सहसंचालक डॉ.सरिता हजारे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे. दरम्यान सोयगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या २३ उपकेंद्राच्या आरोग्य सेवेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागातील गोरगरिब, मोलमजुरी करणाऱ्या नागरिक, महिला, वयोवृद्धांसह मुलांना आरोग्य सेवा मिळावी यासाठी
मराठा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सोपानदादा गव्हांडे हे वीस महिन्यांपासून अधिकारी व शासन दरबारी पाठ पुरावा करीत आहे.सोयगाव तालुका हा डोंगराळ ग्रामीण भाग आहे. तालुक्यात उपकेंद्राच्या नूतन इमारती बांधण्यात आल्या असून आरोग्य सेविका व आरोग्य सेवक स्थानिक ठिकाणी राहत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुदंड सोसत खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावे लागत आहे.याकडे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गितेश चावडा,जिल्हा आरोग्य अधिकारी हे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. आरोग्यमंत्री व लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देऊन सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या समस्येकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. चौकशी करून अहवाल सादर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर यांच्यावर आरोग्य सेवा आयुक्त काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
प्रतिक्रिया:- माझा जन्मच ग्रामीण भागातील गोरगरिब,दुर्बल घटकांच्या सेवेसाठी झाला असून तालुक्यातील आरोग्य यंत्रणेचा सर्वसामान्य गोरगरिब नागरिकांना कोणताही फायदा होत नाही.उपकेंद्राच्या इमारती बांधण्यात आल्या असून काही ठिकाणी तर आरोग्य कर्मचारी नाही तर काही आरोग्य उपकेंद्र अद्यापही उघडलेले नाही.संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई केली जात नाही व जनतेला स्थानिक ठिकाणी आरोग्य सेवा जो पर्यंत मिळत नाही तो पर्यंत शासन दरबारी पाठपुरावा करीत राहणार.
सोपानदादा गव्हांडे
मराठा प्रतिष्ठान,संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र
0 Comments