गोपाळकाल्याच्या रात्री शिर्डीत एका तरुणाची निर्घृण हत्या ! शहरात खळबळ



शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डीत शनिवारी गोपाळकाल्याच्या रात्री  एक धक्कादायक घटना घडली आहे. 21 वर्षीय सानूकुमार ठाकूर या तरुणाची चाकूने वार करून आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करून क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. या घटनेने शिर्डी शहरात खळबळ उडाली असून, स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.ही हत्या 16 ऑगस्टच्या मध्यरात्री घडली. मृत सानूकुमार हा शिर्डीतील रहिवासी होता. 


पोलिसांच्या प्राथमिक तपासातून असे समोर आले आहे की, ही हत्या जुन्या वैमनस्यातून झाली असावी. आरोपी साई कुमावत आणि शुभम गायकवाड हे दोघेही शिर्डीतील रहिवासी आहेत. मृतक आणि आरोपींमध्ये यापूर्वी काही कारणांमुळे वाद झाले होते, आणि त्याच रागाच्या भरात ही हत्या घडल्याचा संशय पोलिसांना आहे.घटनेची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन्ही आरोपींना काही तासांतच अटक केली. सानूकुमारचे वडील नवीनकुमार ठाकूर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता 2023 च्या कलम 103(1), 115(2) आणि 3(5) अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपी पोलिस कोठडीत असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिस या हत्येमागील नेमके कारण आणि वादाचा तपशील शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे अस्वस्थता पसरली आहे. दहीहंडीच्या सणासारख्या आनंदी प्रसंगी अशी हिंसक घटना घडल्याने नागरिकांमध्ये संताप आणि भीती व्यक्त केली जात आहे. शिर्डी व परिसरात दिवसेंदिवस गुंडगिरी वाढत आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीचा पोलिसांनी बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Post a Comment

0 Comments