सावळीविहीर बुद्रुक येथे 19 व 20 ऑगस्ट रोजी श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री शिवलीलामृतग्रंथाच्या पारायणाचे आयोजन!

शिर्डी ( प्रतिनिधी) दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्री संत सेना महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र सावळी विहीर बुद्रुक येथे श्री शिवलीलामृत ग्रंथ पारायणासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथे श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपात श्री संत सेना महाराज पुण्यतिथी निमित्ताने श्री संत सेना महाराज व श्री विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार असून श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपामध्ये मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 ते बुधवार 20 ऑगस्ट 2025 या दोन दिवसांमध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 श्री संत सेना महाराज पुण्यतिथी व श्रावण मासानिमित्त येथे दर वर्षाप्रमाणे श्री नर्मदेश्वर सेवाधाम शिवकुटी चे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शिवलीलामृत ग्रंथ पारायण होणार आहे. मंगळवार दिनांक 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी आठ ते बारा श्री शिवलीलामृत ग्रंथ पूजन व पारायणास मंहत आत्माराम गिरीजी महाराज यांचे उपस्थितीत सुरुवात होणार असून दुपारी बारा वाजता एकादशीनिमित्त फराळाचा महाप्रसाद होणार आहे .तर दुपारी दोन ते पाच शिवलीलामृत ग्रंथ पारायण वाचन होणार आहे. त्याचप्रमाणे बुधवारी 20 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी सात वाजता श्री संत सेना महाराज व विठ्ठल रुक्मिणी माता मंदिरामध्ये अभिषेक करण्यात येणार असून सकाळी आठ ते दहा या वेळेत शिवलीलामृत ग्रंथ पारायण वाचन होऊन पारायणाची  सांगता होणार आहे. त्यानंतर सकाळी दहा वाजता संत सेना महाराजांच्या प्रतिमेची टाळ मृदंगाच्या गजरात गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणूक मंदिरात आल्यानंतर श्री हनुमान मंदिराच्या सभा मंडपात सकाळी 11 ते 12 या कालावधीत श्री नर्मदेश्वर सेवाधाम श्रीपाद शिवकुटीचे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांचे प्रवचन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तरी या सर्व कार्यक्रमात व पारायणासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी सहभाग घ्यावा. असे आवाहन संत सेना महाराज मंडळ, समस्त भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ व सावळीविहीर बुद्रुक व खुर्द चे ग्रामस्थ, भाविकांनी एका पत्रिके द्वारे केले आहे.

Post a Comment

0 Comments