लोहगाव (वार्ताहर): समाजाच्या गरजा ओळखून विविध स्पर्धांमध्ये उभा राहणारा सक्षम विद्यार्थी घडविणे, हे शिक्षकांचे आद्यकर्तव्य असून कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर रयत शिक्षण संस्थेने याचा वेध घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या संख्यात्मक वाढीबरोबर गुणवत्ता पूर्ण वाढीचा ध्यास घेतला आहे, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या गुणवत्ता कक्षाच्या वतीने धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात ज्युनिअर कॉलेज गुणवत्ता कक्ष कार्यकारी शाळेचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी गुणवत्ता कक्ष प्रमुख सहसचिव (ऑडिट) डॉ. राजेंद्र मोरे होते. या कार्यशाळेचे उद्घाटन सहसचिव डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रथम मान्यवरांच्या हस्ते डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. कार्यशाळेचे प्रास्ताविक व स्वागत समन्वयक एन.टी. निकम यांनी केले. यावेळी डी.जी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश जाधव यांनी आपल्या मनोगतातून गुणवत्ता कक्षाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. डॉ. मेनकुदळे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, ज्युनियर कॉलेज हा शैक्षणिक दृष्ट्या मधला महत्त्वाचा टप्पा असून कला व वाणिज्य विभागात गुणात्मक व संख्यात्मक वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. ही गुणवत्ता वाढविण्यासाठी गुणवत्ता कक्षाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेतले असून हे उपक्रम राबवण्यासाठी शिक्षकांनी विचारमंथन करावे. प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी गुणवत्ता कक्षा अंतर्गत स्पर्धेतील सक्षम विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी सज्ज असावे, असे मत व्यक्त केले. यावेळी सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी, जगताप साहेब यांच्यासह पाचही विभागातील निवडक शिक्षक उपस्थित होते. या सर्व शिक्षकांना गुणवत्ता कक्षाच्या आधारे विविध उपक्रमांचे नियोजन देण्यात आले. यावेळी सर्व शिक्षकांमध्ये या विविध उपक्रमांविषयी चर्चाही करण्यात आली. कार्यशाळेचे आभार सहाय्यक विभागीय अधिकारी वाळवेकर साहेब यांनी मानले.
0 Comments