रयतच्या शिक्षकांनी गुणवत्ता सिद्ध करावी: नवनाथ बोडखे



श्रीरामपूर: रयत शिक्षण संस्थेत ज्युनिअर कॉलेज शिक्षकांनी आपले अस्तित्व टिकवायचे असेल तर कला आणि वाणिज्य शाखातील शिक्षकांनी आपल्या विभागातील विद्यार्थ्यांची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ घडवून आणावी. विद्यार्थ्यांना कौशल्यांवर आधारित शिक्षण देऊन शिक्षकांनी आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे मत रयत शिक्षण संस्थेचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी केले व्यक्त केले.
 
अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय कार्यालयात ज्युनिअर कॉलेज गुणवत्ता विकास कक्षाच्यावतीने कला व वाणिज्य शाखातील शिक्षकांचे एक दिवसीय प्रबोधन वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रबोधन वर्गाचे अध्यक्ष विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे यांनी केले. त्यांनी सांगितले की कला कौशल्यातून विद्यार्थ्यांच्या मनात आवड निर्माण करून विद्यार्थ्यांची संख्या व निकाल वाढविणे शक्य आहे. यावेळी व्यासपीठावर संदीप शिंदे, श्रीकांत थोरात हे उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. शरद दुधाट, प्रमोद राऊत यांनी शिक्षकांना विविध सहशालेय व शालेय उपक्रमाबाबत मार्गदर्शन केले. गुणवत्ता विकास कक्ष मार्गदर्शक काकासाहेब वाळुंजकर यांनी विद्यार्थी संख्येचे गांभीर्य लक्षात आणून देत विद्यार्थी संख्या व गुणवत्ता वाढविण्याची उपाययोजना सुचविली. नवनाथ बोडखे यांनी आपल्या भाषणातून सांगितले की, ज्युनियर कॉलेज हा दुर्लक्षित विभाग असून या विभागावर गुणवत्ता आणि संख्या वाढीच्या बाबतीत लक्ष केंद्रित केले जात आहे. विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी अंग झटकून काम करावे आणि आपली गुणवत्ता सिद्ध करून अस्तित्व टिकवावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी विभागातील नगर, नाशिक, बीड जिल्ह्यातील असंख्य शिक्षक या प्रबोधन वर्गास उपस्थित होते. त्या प्रबोधन वर्गाचे शेवटी आरडे सर यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments