दिलीप शिंदे
सोयगाव दि.16- बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने सोयगाव वन विभागाने वन्यप्राण्यांची गणना केली असून, यामध्ये तब्बल 97 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. ही गणना सोयगावच्या वेताळवाडी धरणावर सोमवारी रात्री करण्यात आली. सर्वाधिक नोंद नीलगाय, हरीण, मोर, ससा आणि रानडुकरांची झाली आहे.
वन्यजीव संवर्धन आणि संरक्षणाच्या उद्देशाने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन विभागाकडून ही गणना केली जाते. यंदा 12 मे रोजी ही मोहीम पार पडली. यात सोयगावच्या प्रमुख वेताळवाडी धरणावर मचाण उभारून वनरक्षक आणि वनमजुरांच्या मदतीने निरीक्षण करण्यात आले. यासोबतच ट्रॅकर कॅमेरे आणि फिरती पथके देखील नियुक्त करण्यात आली होती. दरवर्षी बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी पशूगणना होते. या गणनेत पशुंच्या संख्येनुसार संवर्धनासाठी करावयाच्या उपायोजनांचे नियोजन करणे शक्य होते. यामध्ये सोयगावात 97 वन्यप्राणी पशूगणनेत टिपल्याचा अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक नीलगाय, हरीण, मोर, ससा व रानडुक्कर आदींचा समावेश असल्याचे दिसून येत आहे.मात्र वेताळवाडी मधील बिबट्यांनी धरण क्षेत्रात पाठ फिरवल्याने बिबट्यांची शून्य नोंद घेण्यात आली आहे सोमवारी रात्री वेताळवाडी धरणाच्या पात्रात बिबटे आलेच नसल्याचे वनविभागाने सांगितले.
यामध्ये हरीण 7, नीलगाय 15, मोर, लांडोर 7, ससे 8, रानडुक्कर 25, सुतारपक्षी 6, घार 12, वानर 20, आदींचा समावेश आहे. वन विभागाने केलेल्या वेताळवाडी धरणावर सोमवारी रात्री सात वाजता मोरांचे कळप पाणी पिण्यासाठी दाखल झाले होते..या प्रगणनेत वनपरिक्षेत्र अधिकारी अनिल मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल विजय कोळी,शरद चेके ,वैजिनाथ नागरे,मंगेश सनासे आदींनी ही वन्यप्राणी प्रगणना केली.
0 Comments