भारत गौरव ट्रेन - छत्रपती शिवाजी महाराज सर्किट, 9 जून पासून पर्यटकांसाठी ऐतिहासिक पर्वणी-----



दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.18- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाचे औचित्य साधुन, भारतीय रेल्वे खानपान व पर्यटन महामंडळाने आपल्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाला उजाळा देण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनगौरवाचा अनुभव देण्यासाठी एक विशेष पर्यटक ट्रेन 'छत्रपती शिवाजी महाराज सर्किट' ची घोषणा केली आहे. भारत गौरव टुरिझम अंतर्गत 09 जून 2025 पासून सुरू होत आहे. या 5 दिवसांच्या विशेष टूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक स्थळांना भेट, इतिहासावर आधारीत कार्यक्रम असणार आहेत.

 या सहली दरम्यान महाराष्ट्रातील विविध ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असलेल्या ठिकाणांचा पर्यटकांना “याची देही, याची डोळा” अनुभव घेता येणार आहे. 
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि शासन यांच्या वतीने भारत गौरव ट्रेनच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या तेजस्वी इतिहासाशी निगडीत धार्मिक आणि ऐतिहासिक स्थळांना व्यापक प्रसिद्धी मिळवून देण्याचा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा आणि शासनाचा मानस आहे. ही केवळ एक यात्रा नसून, आपल्या वैभवशाली परंपरेचा, सांस्कृतिक वारशाचा आणि स्वाभिमानी इतिहासाचा साक्षात अनुभव घेण्याची सुवर्णसंधी आहे.
             भारतीय रेल्वे विभाग आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून, या ऐतिहासिक उपक्रमासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून विविध अंगांनी सुसज्ज तयारी सुरू आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे या गौरवशाली यात्रेचे हे आगमन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे भव्य दर्शन घडवणारे ठरेल.
          भारत गौरव ट्रेन ज्या-ज्या ठिकाणी पोहोचेल, त्या ठिकाणी असलेल्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहीती पर्यटकांना देण्यात येणार आहे. यात्रेच्या दरम्यान, सर्व प्रवाशांचा अनुभव सुखकर आणि संस्मरणीय व्हावा, यासाठी महामंडळाचे अधिकारी आयआरसिटीसी च्या समन्वयाने प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन करतील. पाच दिवसांच्या या दिव्य प्रवासात रेल्वे स्थानकांपासून ते महाराजांच्या गडकिल्ल्यांपर्यंत, प्रत्येक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणांचा वेध घेत, पर्यटकांना समृद्ध अनुभव दिला जाईल.
प्रत्येक गडकोटावर, ऐतिहासिक स्थळी पर्यटन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन केले जाईल. इतिहासावर आधारित कार्यक्रम, ज्ञानवृद्ध गाईड्स, तसेच स्थानिक शिवप्रेमी संघटनांच्या सहकार्याने याला भावनिक व आध्यात्मिक स्पर्श दिला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा तेजोमय इतिहास, महाराष्ट्राची शौर्यशाली परंपरा, आणि आपली समृद्ध संस्कृती हे जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याच्या शासनाच्या ध्यासाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ संपूर्ण समर्पणाने साथ देत आहे. या उपक्रमामुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला नवे क्षितिज गवसणार असून, प्रत्येक भारतीयाच्या हृदयात शिवप्रेमाची जाज्वल्य ज्वाला जागवली जाणार आहे.
        संपूर्ण उपक्रमास पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ. अतुल पाटणे (भा.प्र.से.) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहासाच्या या सहलीमुळे महाराष्ट्राच्या पर्यटनाला एक वेगळा आयाम मिळणार आहे. या उत्साही यात्रेत सहभागी होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वसा उचलावा, आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगावा, आणि नव्या पिढीला या इतिहासाचे दर्शन घडवावे”, असे आवाहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सूर्यवंशी (भा.प्र.से.) यांनी केले आहे. या उपक्रमासाठी महामंडळाचे महाव्यवस्थापक श्री. चंदशेखर जयस्वाल, वरीष्ठ व्यवस्थापक संजय ढेकणे व सर्व संबंधित अधिकारी, समन्वय आदी परीश्रम घेत असून, छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले, महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आणि लोकसंस्कृती सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी महामंडळ सतत प्रयत्नशील आहे, असे महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक दिपक हरणे यांनी सांगितले आहे.

चौकट--उपरोक्त सहलीसाठी विविध पॅकेजिस तयार करण्यात आली असुन सोयीनुसार इकोनॉमी (SL), कम्फर्ट (3AC), सुपीरियर (2AC) अशा प्रकारच्या सुविधांची निवड करता येणार आहे. सदरच्या पॅकेज बाबत सविस्तर माहीती www.irctctourism.com या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments