राजकुमार गडकरी
शिर्डी (प्रतिनिधी ) शिर्डी येथील एका हॉटेलमधून सुमारे ३ कोटी २६ लाख रुपयांचे सुमारे साडेतीन किलो वजनाचे सोने आणि रोख रक्कम चोरीला गेल्याची घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सोन्याचे व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५, रा. आवाल घुमटी, गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे.
आपला चालक सुरेश कुमार भूरसिंह राजपुरोहित (रा. चौहटन, राजस्थान) याच्यावरच खिशी यांनी संशय व्यक्त केला आहे. खिशी हे मुंबईतील त्यांच्या होलसेल सोन्याच्या फर्ममधून सुमारे ४ किलो ८७३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने घेऊन ७ मे रोजी शिर्डीत आले होते.
त्यांच्यासोबत कामगार चंद्रप्रकाश प्रजापती आणि चालक सुरेश कुमार होते. ते हॉटेल साई सुनीताच्या रूम नंबर २०१ मध्ये मुक्कामी होते. खिशी हे अहिल्यानगर ते मनमाडपर्यंत विविध सराफ दुकानांमध्ये सोने विक्रीसाठी घेऊन जात होते. दिवसभर फिरल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये परत मुक्कामी येत होते. १३ मे रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जेवण करून ते रूममध्ये झोपले. त्यांनी सोन्याच्या दागिन्यांची बॅग रुममध्ये बेड आणि टेबलच्या मध्ये ठेवलेली होती. रूम आतून लॉक होती. मालक व दोघे कामगार एकाच रुममध्ये थांबले होते.
१४ मे रोजी सकाळी ६ वाजता खिशी यांचा चुलत भाऊ शैलेंद्रसिंह हा त्यांच्याकडील पेमेंट घेण्यासाठी हॉटेलवर आला. त्याने रूमचा दरवाजा उघडला असता तो उघडा होता. आत पाहिले असता, चालक सुरेश कुमार रूममध्ये नव्हता. त्याचा मोबाइल फोन आणि कपडे रूममध्येच होते. हॉटेल आणि मंदिर परिसरात शोध घेऊनही तो सापडला नाही.
खिशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक सुरेश कुमार हा त्यांच्याकडे दोन महिन्यांपासून कामाला होता. त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. त्याने आपला विश्वासघात करून चोरी केल्याची त्यांची तक्रार आहे. चालक आपला मोबाइल रुममध्येच ठेवून पसार झाला आहे.
विविध सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेली आहे.
३ कोटी २२ लाख रुपये किंमतीचे विविध सोन्याचे दागिने आणि ४ लाख रुपयांची रोकड चोरीला गेल्याचे आढळून आले. याप्रकरणी अ.पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे, पोलिस उपअधीक्षक शिरीष वमने यांच्या आदेशानुसार शिर्डीचे पोलिस निरीक्षक रणजीत गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव हे अधिक तपास करीत आहेत. मात्र या प्रकरणामुळे शिर्डीत मोठी चर्चा सध्या सुरू आहे.
0 Comments