टाकळीभान प्रतिनिधी :- राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील ७० वर्षे जुनी परंपरा असलेली जय बजरंग तालीम शेवटच्या घटका मोजत आहे. तरी या जय बजरंग तालीम इमारतीचे नूतनीकरण होऊन भव्य इमारत व्हावी अशी मागणी मा. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब कुसमुडे यांनी केली आहे.
यावेळी प्रतिनिधींना माहिती देताना कुसमुडे म्हणाले की राहुरी तालुक्यातील वांबोरी म्हणून सर्वात जुनी बाजारपेठ असलेले मोठे गाव आहे. आसपासच्या पंधरा एक गावांची बाजारपेठ असल्याने वांबोरी बाजारपेठेचे व सधन गाव म्हणून ओळखले जाते. या गावास अनेक जुन्या गोष्टींचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. त्याप्रमाणेच या गावातील हनुमान नगर येथील जय बजरंग तालीम ही सुमारे ७० वर्ष पूर्वीची तालीमची इमारत या गावात आहे. या तालमीने अनेक नामांकित मल्ल घडविले असून राज्य व राष्ट्रीय पातळीवरील पर्यंत मल्ल नावारुपास आणले आहेत.
परंतु काळाच्या ओघात ७० वर्षांचा कालावधी लोटल्याने या एकेकाळी नावाजलेल्या जय बजरंग तालीम इमारतीची पडझड होत असून या जुन्या तालीमीचे मातीचे बांधकाम आहे. सन २०२० जुलै मध्ये पावसाचे पाणी सदर इमारतीच्या भिंतीत जाऊन मुरल्यामुळे पूर्वेकडील भिंत पूर्ण कोसळलेली आहे. सदर माहिती ग्रामपंचायत वांबोरी येथील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांना लेखी पत्रव्यवहार द्वारे केलेली आहे, तसेच ग्रामसभेत सदर प्रश्नाबाबत समक्ष उपस्थित राहून कळविले आहे, तरीसुद्धा कोणीही आज पर्यंत याची दखल कोणी घेतलेली नाही,
सदर तालीमत तयार झालेले अनेक जण राजकारणात व विविध ठिकाणी शासकीय सेवेत उच्च पदावर जाऊन, त्यांनी या तालमीचा लाभ करून घेतलेला आहे, त्यांना सदर तालीम बद्दल आपुलकी नाही, व भविष्याच्या भावी पिढीची काळजी नसून, नवीन पिढी व्यसनाच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य बरबाद होताना दिसत आहे, तरी आम्ही वेळोवेळी पाठपुरावा करून सुद्धा कोणी दखल घेत नाही.
जिल्ह्यामध्ये वांबोरी गावाचे मोठे नाव असून विकासाचा गव गवा केला जातो, परंतु या भावी पिढी घडविण्याच्या चांगल्या कामाला सहकार्य होत नसल्याने आश्चर्य वाटत आहे. आम्ही वांबोरी गावचे रहिवासी असल्याने व मी पोलीस खात्यामध्ये प्रामाणिकपणे ३९ वर्ष तीन महिने सेवा करून वांबोरी गावातच स्थायिक झालेलो आहे. मला वांबोरी गाव बद्दल आदर, प्रेम व सहानुभूती वाटत असल्याने, आम्ही सदर तालमीच्या इमारतीच्या दुर्दशेबद्दल सत्ताधारी व विरोधी पक्ष राजकीय नेते व कार्यकर्ते यांना वेळोवेळी माहिती देऊन सुद्धा सहकार्य होत नसल्याने खंत वाटत असून, भावी पिढी चांगली घडवण्यासाठी या तालमीच्या ठिकाणी नवीन भव्य तालीम इमारत व्हावी व या चांगल्या गोष्टीसाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी मा. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब कुसमुडे यांनी केली आहे.(सहयोगी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळीभान)
0 Comments