दिलीप शिंदे सोयगाव
सोयगाव दि.18-- सोयगाव तालुक्यातील बनोटी मंडळात सॅटेलाईटला गट जोडणी करतांना झालेल्या चुकीचा फटका शेतकऱ्यांना बसला असून ई पीक पाहणी करतांना बनोटी मंडळातील नोंदी इतरत्र ठिकाणी दर्शविण्यात येतात त्यामुळे या भागातील ई पीक पाहणी झालीच नाही.
रब्बी हंगामातील शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी कालावधी 15 जानेवारीपर्यंतच होता. हा कालावधी संपलेला असून, आतापर्यंत केवळ 21 टक्केच पेरणी क्षेत्राची ई-पीक पाहणी झाली आहे. संपूर्ण पाहणी पूर्ण न झाल्यास संबंधित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. त्यामुळे प्रशासनाने ई-पीक पाहणी पूर्ण करावी, अशी मागणी आमदार संजना जाधव यांच्या आढावा बैठकीत शुक्रवारी शेतकऱ्यांनी कृषी आणि महसूल विभागाकडे केली आहे.
15 जानेवारी या अंतिम दिनापर्यंत सोयगाव तालुक्यातील ई-पीक पाहणी पूर्ण झालेली आहे. याची टक्केवारी केवळ 21.69 टक्के इतकी आहे. ई-पीक पाहणीचे डिजिटल क्रॉप सर्व्हे हे मोबाईल अँप चालत नसल्याने शेतकरी ऑनलाईन ई-पीक पाहणी करु शकले नाहीत. शेतकरी स्तरावरून प्रलंबित असलेल्या क्षेत्राची ई-पीक पाहणी करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे. शेतकरी स्तरावरील ई-पीक पाहणी करण्याचा कालावधी संपल्याने प्रशासनाने आपल्या स्तरावरून ई-पीक पाहणीची प्रक्रिया सुरु करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.सोयगाव तालुक्यात ई-पीक पाहणी न केल्याने शेतकऱ्यांना मागील काही वर्षात अनुदान, पीकविमा, नैसर्गिक आपत्ती यातील नुकसान भरपाई मिळाली नाही. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने 100 टक्के ई-पीक पाहणी करावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.
0 Comments