राहुरी / प्रतिनिधी : तालुक्यात राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असणाऱ्या केंदळ खुर्द ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शिवाजी गोविंद शेजुळ यांचे पद सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने अपात्र ठरविण्यात आले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी नुकतेच आदेश दिले आहेत.
याबाबतची माहिती अशी की, केंदळ खुर्द ग्रामपंचायतची निवडणूक डिसेंबर २०२२ मध्ये झाली होती. यामध्ये नऊ सदस्य बिनविरोध झाले होते. तर लोकनियुक्त सरपंच पदासाठी शिवाजी गोविंद शेजुळ हे निवडून आले होते. एका गटाचे पाच व दुसऱ्या गटाचे चार असे संख्याबळ होते.
येथील रहिवासी सुरेश भारत जाधव यांनी सरपंच शिवाजी शेजुळ यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करावे, याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे डिसेंबर २०२३ मध्ये अर्ज दाखल केला होता. एके ठिकाणी चार खोल्या बांधकाम करून व्यवसाय व कुटुंबासह राहात आहेत. तसेच दुसऱ्या ठिकाणी गवती छप्पर टाकून तेथे अतिक्रमण करून ती जागा ताब्यात घेऊन स्वतःच्या वैयक्तिक वापरासाठी जागेचा उपभोग घेत असल्या बाबतची तक्रार दाखल करण्यात आली होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी या बाबत दोन्ही बाजूंचे म्हणणे, युक्तिवाद व प्रत्यक्ष पुरावे यावरून शेजुळ यांनी सरकारी जागेवर अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा निर्णय दिला आहे. अर्जदारा तर्फे ॲड. विनय गरुड यांनी काम पाहिले. त्यांना विधिज्ञ संकेत गर्जे, शुभम गर्जे, आदेश लोखंडे यांनी सहकार्य केले. शेजुळ यांचे सरपंच पद अपात्र ठरविण्यात आल्यामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
0 Comments