शिर्डी -(राजकुमार गडकरी)
दिवाळीची पहिली चाहूल लागते ती एका अनोख्या उत्सवाने. आश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील द्वादशीला आपल्या अंगणात गोमातेचे पाऊल पडते. आपण गायी-वासराचे पाय धुतो, कपाळावर हळद-कुंकू लावतो, गळ्यात झेंडूच्या फुलांची माळ घालतो आणि पुरणपोळीचा घास भरवतो.
या मंगल दिवसाला आपण प्रेमाने 'वसुबारस' म्हणतो, तर पंचांगात आणि पुराणांमध्ये याच दिवसाची नोंद 'गोवत्स द्वादशी' म्हणून आढळते. दिवाळीची चाहूल या गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस या सणापासून लागते. असे प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प संजयजी महाराज जगताप (भऊरकर) यांनी माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले की,सर्वसाधारणपणे आपण गोवत्स द्वादशी व वसुबारस या दोन्ही नावांना एकाच परंपरेचे दोन शब्द समजतो. पण जर प्राचीन ग्रंथ, लोककथा आणि आपल्या संस्कृतीचा गाभा उलगडून पाहिला, तर एक रंजक प्रश्न उभा राहतो: 'गोवत्स द्वादशी' आणि 'वसुबारस' या एकाच सणाची दोन नावे आहेत,
गोवत्स' हा शब्द समजायला अगदी सोपा आहे. 'गो' म्हणजे गाय आणि 'वत्स' म्हणजे तिचे लहान, दूध पिणारे वासरू. त्यामुळे गाई आणि वासराची एकत्र पूजा करणे म्हणजे गोवत्स द्वादशी.
पण 'वसुबारस' या शब्दातील 'वसु' हा शब्द नेमका कोणासाठी आला आहे?वसु' म्हणजे केवळ धन-दौलत, की यामागे प्राचीन पुराणांमध्ये उल्लेख असलेले 'अष्टवसू' नावाचे स्वतंत्र देवगण दडलेले आहेत? कारण आपल्या परंपरेत यक्ष आणि गंधर्वांप्रमाणेच 'वसू' हा एक स्वतंत्र आणि पूजनीय देवगण मानला गेला आहे.
प्राचीन साहित्यात ३३ मुख्य देवतांचे समूह सांगितले जातात—१२ आदित्य, ११ रुद्र आणि ८ वसू. या आठ देवतांच्या समूहाला 'अष्टवसू' म्हटले जाते.
उपनिषदांमध्ये या आठ वसूंना विश्वाचा आधार मानले गेले आहे. अग्नी, पृथ्वी, वायू, अंतरिक्ष, सूर्य, आकाश, चंद्र आणि नक्षत्रे ही निसर्गाची मूलभूत तत्त्वे म्हणजेच अष्टवसू होत. हे सर्व घटक जगाला सामावून घेतात आणि जीवन देतात, म्हणून त्यांना वसू म्हटले गेले.
पुराणांमध्ये आणि महाभारतात पुढे यांना धर, ध्रुव, सोम, अह, अनिल, अनल, प्रत्युष आणि प्रभास अशी स्वतंत्र देवतारूपे मिळाली. श्रीमद्भगवद्गीतेतही भगवान श्रीकृष्णांनी आपल्या श्रेष्ठ विभूतींचे वर्णन करताना म्हटले आहे."रुद्रांमध्ये मी शंकर आहे आणि सर्व वसूंमध्ये मी अग्नी आहे."
यावरून स्पष्ट होते की, वसू हा केवळ संपत्तीचा शब्द नसून ती एक दैवी शक्ती आहे.अष्टवसूंच्या पौराणिक कथांमध्ये एक अत्यंत रंजक प्रसंग येतो, ज्याचा संबंध थेट एका दिव्य गाईशी जोडलेला आहे.
महर्षी वसिष्ठ यांच्या आश्रमात 'नंदिनी' नावाची कामधेनूची दिव्य कन्या वास्तव्य करत होती. एकदा आठही वसू आपल्या पत्नींसह त्या वनातून फिरत असताना एका वसूच्या पत्नीची दृष्टी त्या लोभस गाईवर पडली. आपल्या मैत्रिणीसाठी तिने ती गाय आणण्याचा हट्ट धरला. पत्नीच्या आग्रहाखातर वसूंनी वसिष्ठ ऋषींच्या आश्रमातून नंदिनीचे आणि तिच्या वासराचे अपहरण केले.
वसिष्ठांना हे समजताच त्यांनी संतप्त होऊन आठही वसूंना शाप दिला—"तुम्ही देव असूनही चोरी केली, म्हणून तुम्हाला मर्त्य मानवासारखा पृथ्वीवर जन्म घ्यावा लागेल."वसूंनी क्षमायाचना केल्यावर ऋषींनी सात जणांचा शाप कमी केला, पण चोरीचा मुख्य सूत्रधार असलेल्या वसूला दीर्घकाळ मानवी आयुष्य जगावे लागेल असे सांगितले.
पुढे हेच आठ वसू गंगा आणि राजा शंतनू यांच्या पोटी जन्माला आले. गंगेने जन्मताच पहिल्या सात पुत्रांना नदीत विसर्जित करून शापमुक्त केले. आठवा पुत्र मात्र शंतनूने वाचवला, आणि तोच मुलगा पुढे 'देवव्रत' म्हणजेच 'भीष्म पितामह' म्हणून प्रसिद्ध झाला!
या संपूर्ण कथेत अष्टवसूंच्या नशिबाचे चाक एका गाईभोवती फिरते. त्यामुळे वसू आणि गोमाता यांचा संबंध किती प्राचीन आहे, हे यावरून दिसून येते.
दुसऱ्या बाजूला 'गोवत्स द्वादशी' ही पूर्णपणे शास्त्रोक्त आणि वात्सल्याची परंपरा आहे.
या दिवशी संध्याकाळी सवत्सा धेनूची म्हणजे दूध पिणाऱ्या लहान वासरासहित असलेल्या गाईची पूजा केली जाते. तिला हळद-कुंकू लावून, अर्घ्य देऊन, कामधेनू आणि सुरभीचे स्मरण करून प्रार्थना केली जाते.
या व्रताचा सर्वात कडक नियम म्हणजे 'अळणी भोजन'. या दिवशी व्रती व्यक्ती गाईचे दूध, दही, तूप किंवा ताक अजिबात खात नाही. एवढेच नव्हे, तर तळलेले किंवा भाजलेले अन्न टाळून उकडलेले, साधे, मीठ नसलेले (अळणी) अन्न खाल्ले जाते.
गाईचे दूध हे तिच्या वासराचा पहिला हक्क आहे आणि माणसाने त्यावर डल्ला मारू नये, हा किती उदात्त आणि दयाळू संदेश या व्रतातून मिळतो!
संस्कृतमध्ये 'वसु' या शब्दाचा एक अर्थ 'धन' किंवा 'द्रव्य' असाही होतो. सोने-नाणी, नोटा किंवा बँका अस्तित्वात येण्यापूर्वी आपल्या खेड्यापाड्यात सर्वात मोठे धन कोणते होते? तर ते होते 'पशुधन'!ज्याच्या दारात भरपूर गाई-वासरे आणि बैलांची जोडी, तो खरा श्रीमंत मानला जात होता. गाय केवळ दूध देत नाही, तर शेती पिकवण्यासाठी खत, गोमूत्र आणि बैल देते. संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य आणि शेती तिच्यावरच अवलंबून असायची.म्हणूनच आपल्या शेतकरी संस्कृतीने गोमातेला केवळ जनावर न मानता साक्षात घराचे 'मूर्त धन' म्हणजेच 'वसु' मानले. ज्याप्रमाणे धनत्रयोदशीला सोन्या-नाण्यांची पूजा होते, अगदी त्याचप्रमाणे दिवाळीच्या सुरुवातीला घराचे खरे धन असलेल्या गोधनाची पूजा सुरू झाली. यातूनच 'पशुधनाची द्वादशी' म्हणजे 'वसु-बारस' हा गोड शब्द लोकमानसात रुजला.
विदर्भासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत या दिवसाला अत्यंत आपुलकीने 'ढोर दिवाळी' असेही म्हटले जाते.
गोवत्स द्वादशी आणि वसुबारस या दोन वेगवेगळ्या प्रवाहांचा सुंदर संगम कसा झाला, हे समजून घेणे मोठे आनंददायी आहे.
गोवत्स द्वादशी हा पुराणांनी दिलेला सात्त्विक आणि संयमाचा मार्ग आहे, जिथे मुक्या प्राण्यांप्रती दया, अळणी उपवास आणि वात्सल्याची पूजा केली जाते.
वसुबारस हा आपल्या मातीचा, शेतकरी संस्कृतीचा आणि गावगाड्याचा लोकोत्सव आहे, जिथे वर्षभर राबणाऱ्या पशुधनाचे लाड केले जातात, घरासमोर सुंदर रांगोळ्या काढल्या जातात आणि गोठ्यात आनंदाचा नैवेद्य दाखवला जातो.
दिवाळी हा मुळातच कृतज्ञतेचा आणि समृद्धीचा सण आहे. त्यामुळे सणाची सुरुवात करताना एका बाजूला गोमातेच्या रूपात अष्टवसूंच्या निसर्गतत्त्वांना नमन झाले, आणि दुसऱ्या बाजूला संसाराला जगवणाऱ्या पशुधनाची पूजा झाली.
काळाच्या ओघात शास्त्र आणि लोकसंस्कृती एकमेकांत इतकी एकजीव झाली की, दोन्ही नावांचा भेद विरून गेला आणि एकाच दिवशी गोमातेच्या रूपात वात्सल्याची आणि वैभवाची अखंड ज्योत तेवू लागली. असा हा वसुबारस म्हणजेच गोवत्स द्वादशी मोठ्या आनंदाने सर्वजण साजरा करतात. असे प्रसिद्ध कीर्तनकार हभप संजयजी महाराज जगताप यांनी म्हटले आहे.व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments