दिलीप शिंदे
सोयगाव: सोयगाव तालुक्यातील सावरखेडा येथील शेतकऱ्याने कर्ज फेडण्याच्या विवंचनेतून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. चंद्रकांत सखाराम नवगिरे वय ४९ वर्षे रा.सावरखेडा असे विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. नवगिरे यांची सावरखेडा शिवारात गट क्रमांक १८ मध्ये सात एकर जमीन आहे.
पाच एकर जमीन त्यांनी वार्षिक ठोक्याने केली होती. शेतीच्या मशागती करिता सोसायटी कडून ८५०००/ रुपये कर्ज घेतले होते.या शेतजमिनीत मक्का पेरलेली होती मात्र मक्का पिकाला कणसं नसल्याने हातात काहीच येणार नाही यामुळे घेतलेले कर्ज, बि-बियाणे,औषधी, खते यांची असलेली उधारी कशी फेडायची या विवंचनेतून शेतकऱ्याने दि.०७ बुधवारी दुपारी दोन अडीच वाजेच्या सुमारास शेतात विषप्राशन केले.त्यांना तत्काळ सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सामान्य जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. जिल्हा रुग्णालयाकडे घेऊन जात असतांना त्यांचा मृत्यू झाला रात्री दोन वाजता मृतदेह सोयगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. गुरुवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अजित पाटील यांनी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.दुपारी सावरखेडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, सुन,पाच मुली असा परिवार आहे. याप्रकरणाची फर्दापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली निलेश लोखंडे व संतोष उबाळे पुढील तपास करीत आहे.
0 Comments