श्रीरामपूर : जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर त्यांच्या वतीने वरिष्ठ व निवड श्रेणी जिल्हास्तरीय प्रशिक्षकांचे प्रशिक्षण आत्मा मलिक इंटरनॅशनल स्कूल, कोकमठाण येथे दिनांक २१ ते २४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित केल्याची माहिती जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था,अहिल्यानगर येथील वरिष्ठ अधिव्याख्याता तथा प्रशिक्षणाचे मुख्य समन्वयक अरुण भांगरे यांनी दिली.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांच्या आर्थिक व सेवाविषयक लाभांशी निगडित सदरचे प्रशिक्षण असल्याने शिक्षकांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे. प्रथमतः जिल्हास्तरीय प्रशिक्षणाचे आयोजन कोकमठाण येथे केले जात आहे. यानंतर तालुका स्तरावर हे प्रशिक्षण दिनांक १३ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत प्रत्येक तालुक्यात होणार आहे. या तालुकास्तरावर काम करणाऱ्या सर्व सुलभकांना राज्यस्तरावर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या तज्ज्ञ सुलभकांकडून चार दिवस प्रशिक्षण दिले जाणार आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अहिल्यानगर येथील प्राचार्य डॉ.राजेश बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ अधिव्याख्याता तथा जिल्हा प्रशिक्षण प्रमुख अरुण भांगरे यांच्या नेतृत्वाखाली आणि अनमोल होन यांच्या तांत्रिक सहकार्याने या प्रशिक्षणात अहिल्यानगर जिल्ह्यातील २३६ सुलभकांना हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. तर तालुकास्तरावर जिल्ह्यातील २८६९ पात्र शिक्षकांना हे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण नोव्हेंबर महिन्यात दिले जाणार आहे.
0 Comments