नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांमध्ये एकल महिलांनाही सन्मान व सहभागाची संधी देण्यात यावी, असे आवाहन साऊ एकल महिला समिती महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख सामाजिक कार्यकर्ते श्री.हेरंब कुलकर्णी, अशोक कुटे,प्रकाश जोंधळे,डॉ.संजय उबाळे, यांच्यासह राज्यातील विविध जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.
आपल्या समाजात धार्मिक कार्यक्रमांमध्ये अनेकदा एकल महिलांना दूर ठेवले जाते, तसेच सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांना अपेक्षित स्थान दिले जात नाही. ही सामाजिक मानसिकता बदलण्याची गरज असून एकल महिलांना सन्मानाने समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी करून घेण्यासाठी साऊ एकल महिला समिती मार्फत एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण, गणेशोत्सवात एकल महिलांच्या हस्ते आरती, नवरात्र उत्सवात महिलांच्या हस्ते देवीची आरती यासारख्या विविध कार्यक्रमांमध्ये एकल महिलांना सन्मान मिळवून देण्यासाठी उपक्रम राबवले जातात.
नवरात्र उत्सव काळात विविध प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते दररोज देवीची आरती केली जाते. त्याच धर्तीवर एक दिवस एकल महिलांच्या हस्ते देवीची आरती आयोजित करावी, असे आवाहन विविध मंडळांना आणि कार्यकर्त्यांना साऊ एकल महिला समिती मार्फत करण्यात आले आहे.
राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील जयश्री टुपके आणि हनुमंतगाव येथील सुनिता कदम यांच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली.
0 Comments